स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
मागील दोन वर्षात ६५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आश्वसित प्रगती योजनेचा लाभ व ३४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
नवी मुंबई : स्वच्छता, सुशोभिकरण, पर्यावरण अशा विविध क्षेत्रात नवी मुंबईचा नावलौकिक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर होत असताना नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधा गुणवत्तापूर्ण असण्याकडे विशेष दिले जात आहे. याकामी कार्यरत असणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींकडे नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष असून कर्मचारीहिताचे विविध निर्णय घेताना विविध विभागातील २० अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ३० कर्मचाऱ्यांना ३ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे.
यामध्ये तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ३० कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली असून यामध्ये ८ उपलेखापाल, २ श्रवण व वाचा तज्ज्ञ, १ मानसोपचार तज्ज्ञ, ४ हस्तकला शिक्षक, १ शारीरिक शिक्षक निदेशक, १ व्यवसायोपचार तज्ज्ञ, २ चित्रकला शिक्षक, २ शिपाई, ४ मुकादम, ५ सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. मे २०२१ पासून मागील २ वर्षांत ६२१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना ३ लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला असून आज ३० अधिकारी, कर्मचारी यांना हा लाभ देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मे २०२१ पासून २ वर्षात एकूण ६५१ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार १२ व २४ व्या वर्षी मिळणारे आश्वासित प्रगती योजनेचे दोन लाभ आता सातव्या वेतन आयोगानुसार १० व्या, २० व्या व ३० व्या वर्षी असे ३ लाभांच्या स्वरूपात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार मिळत असून या निकषात बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना ते लवकरात लवकर देण्यात यावेत असे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.
त्यानुसार पदोन्नती समितीच्या नियमित बैठका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली होत असून तेथील निर्णयांची पुढील कार्यवाही प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितिन नार्वेकर यांच्यामार्फत तातडीने केली जात आहे. पदोनत्ती समितीच्या कामकाजाचा आढावा आयुक्तांमार्फत नियमितपणे घेतला जात असून पदोन्नती प्रमाणेच ३ लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभही निकषात बसणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे. यासोबतच पदोन्नतीस पात्र १२ प्रशासकिय अधिकारी आणि ८ स्वच्छता निरीक्षक अशा एकूण २० कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून मे २०२१ पासून मागील २ वर्षात एकूण ३४६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.
अशाप्रकारे मागील 2 वर्षांच्या कालावधीत आजच्या ३० कर्मचाऱ्यांसह एकूण ६५१ अधिकारी, कर्मचारी यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ तसेच आज २० कर्मचाऱ्यांसह मागील २ वर्षात एकूण ३४६ अधिकारी, कर्मचारी यांना पदोन्नत्या देण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कर्मचारीहिताय निर्णयामुळे महापालिका अधिकारी, कर्मचारीवृंदाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कामावर होणार असून यामुळे नागरी सुविधा परिपूर्ती कार्याला अधिक गतीमानता प्राप्त होईल असा विश्वास आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केलेला आहे.