स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ८ मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका संचालित ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी मुंबई यांच्या वतीने नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथील बाहयरुग्ण विभागात उपस्थित रुग्णाच्या नातेवाईकांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक डॉ. संध्या खडसे व सहाय्यक प्राध्यापिका डॉ.माधवी इंगळे यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांना थॅलेसेमिया आजाराची माहिती दिली. यामध्ये थॅलेसेमिया मेजरची लक्षणे, आजाराचे अनुवांशिक मूळ, आजीवन रक्त संक्रमण आवश्यक असलेले रुग्ण, आयुष्यभर रक्त चढवल्यामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंती तसेच लोहाचे प्रमाण जास्त असलेल्या रूग्णांविषयी माहिती देण्यात आली.
थॅलेसेमिया आजार असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपण हा आशेचा किरण आहे. या उपचार पध्दतीबाबत समाजात जागरूकता निर्माण झाल्यामुळे रूग्ण पूर्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या उपचाराकरिता स्वयंसेवी संस्थांमार्फत रुग्णांना आर्थिक मदतही दिली जाते. याबाबतची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे २०११ मध्ये थॅलेसेमिया डे केअरची स्थापना करण्यात आली असून येथे आत्तापर्यंत ८० हून अधिक रुग्णांची नोंदणी झालेली आहे. यापैकी ११ रुग्णांवर यशस्वी अस्थिमज्जा प्रत्यारोपण करण्यात आले आहे, सध्या रूग्णालयातील सेंटरमार्फत रक्तसंक्रमणावर अवलंबून असलेल्या ६४ थॅलेसेमिया रुग्णांबरोबर कार्डियाक स्कॅन, लोहाचे प्रमाण जास्त असलेले बोन स्कॅन अशा सेवा रूग्णांना पुरविण्यात येतात. त्यापैकी १८ बालरूग्ण आहेत आणि उर्वरित प्रौढ रूग्ण आहेत.
जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये रांगोळी, पोस्टर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये येरळा नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आजाराच्या महत्त्वपूर्ण पैलूंचे रांगोळी व रंगचित्रांतून सुंदर चित्रण केले.
यावेळी पथनाटयाव्दारे थॅलेसेमिया मेजरची लक्षणे, प्रसूतीपूर्व तपासणीचे महत्त्व आणि थॅलेसेमिक बालकाचा जन्म पूर्णपणे रोखणे, सरकारी केंद्रांवर उपलब्ध सुविधा यावर प्रबोधन करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे विद्यार्थी, निवासी डॉक्टर्स, स्टाफ नर्स आणि मॅट्रॉन व्यतिरिक्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कमी हिमोग्लोबिन असलेल्या एएनसी मातांची गंभीरपणे काळजी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसीस सारखे उपाय करावेत असे आवाहन रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले. सदर थॅलेसिमिक आजाराचे ३५ प्रौढ रूग्ण असून ते नोकरी करत असल्याने थॅलेसेमिक रुग्णांच्या सोयीनुसार जागतिक थॅलेसेमिया दिन कार्यक्रमाचा आणखी एक भाग आयोजित करण्यात येणार आहे.