नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या मुलभूत सोयी सुविधांबाबत तसेच येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी प्रलंबित विकास कामांसंदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली. तत्पूर्वी खासदार राजन विचारे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत वाशी, नेरूळ, दिवाळे गाव येथे सिडकोने ३५ वर्षांपूर्वी या ठिकाणी १४ होल्डिंग पाँड उभे केले होते. या होल्डिंग पाँड मधून पावसाळ्यात समुद्रमार्गे येणारे पाणी पुन्हा समुद्रात सोडण्याचे काम करीत होते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व पंप हाऊस बंद पडले आहेत. वाशीतील (होल्डिंग पाँड) पंप हाऊस धोकादायक झाले असून कोणत्याही क्षणी कोसळू शकते. हे जर कोसळल्यास शहरात पाणी घुसू शकते त्यावर तातडीने उपयोजना करण्याच्या सूचना आयुक्तांना खासदार राजन विचारे यांनी दिल्या. त्यांनी या कामासाठी २९ कोटी मंजूर झाले असून एम सी झेड एम ए याची परवानगी मिळाल्यास आपण तात्काळ याचे काम सुरू करू तत्पूर्वी याची दुरुस्ती करून जो साठलेला गाळ आहे, तो कमी करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आयुक्तांनी खा विचारे त्यांना दिले.
त्यावेळी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, संदीप पाटील, संतोष घोसाळकर, माजी नगरसेवक एम.के.मढवी, मधुकर राउत, करण मढवी, विजयानंद माने, भारती कोळी, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटक सौ. रंजना ताई शिंत्रे, उपशहर प्रमुख महेश कोटीवाले, माजी परिवहन सदस्य समीर बागवान, विशाल विचारे तसेच विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत खासदार राजन विचारे यांनी खालील प्रमाणे मुद्दे मांडून पत्राद्वारे निवेदन दिले
नवी मुंबई हे शहर सिडकोने विकसित केलेले शहर म्हणून ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने सिडको महामंडळाची स्थापना करून आज ५३ वर्ष पूर्ण झाली आहेत. ठाणे, उरण, पनवेल या तालुक्यातील ९५ गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी सिडको महामंडळाकडे वर्ग केल्याचा शासन निर्णय घेण्यात आला. कालांतराने सिडकोने या नवी मुंबई शहरात रेल्वेचे जाळे विणुन स्थानकांची निर्मिती केली. शहरात दळणवळण व रोजगार वाढल्याने नोकरदार वर्ग नवी मुंबई शहराकडे वळू लागला व शहराची भरभराट झाली. या नवी मुंबई महापालिकेची स्थापना १ जानेवारी १९९२ रोजी केली व त्यास ३१ वर्ष पूर्ण झाली असून या नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रस्ते, गटार, पाणी-पुरवठा, समाज मंदिर, खेळाचे मैदान अपुरे पडू लागले.
सन २०१४ ला खासदार राजन विचारे प्रतिनिधित्व करत असताना या नवी मुंबई शहरासाठी व येथील नागरिकांसाठी व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात बैठका घेऊन शाळा, रस्ते, पाणी-पुरवठा, समाज मंदिर व खेळाच्या मैदानासाठी असे अनेक भूखंड मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत होतो. त्याला यशही आले परंतु नवी मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे सन २०३८ पर्यंत चा विचार केल्यास भविष्यात भूखंड कमी पडू नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या विकास आराखडात ६०० भूखंड नव्याने मिळविण्यासाठी मागणी केली होती. यासाठी अधिक प्रयत्न करावेत.
भूखंड संरक्षण – नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात नव्याने तयार केलेले उद्यान, मैदान, पार्किंग व रस्ते आरक्षित केलेले भूखंड सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न करावे.
दारावे गावकीचा भूखंड – नवी मुंबईतील दारावे गावातील गावकीच्या असलेल्या भूखंडावर गावकरी गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यक्रमासाठी सदर भूखंड वापरीत असतात. परंतु नुकताच एका बांधकाम व्यवसायिकाने त्या जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामास गावकऱ्यांचा विरोध असून याबाबत महापालिकेने लक्ष घालून सदर भूखंडावर गावकऱ्यांसाठी समाज मंदिर उभे करावे.
दिवाळे गावातील भूखंड – बेलापूर येथील दिवाळे गावातील सेक्टर १४ भूखंड क्रमांक ७० हा येथील ग्रामस्थांनी ठेवलेला एकमेव भूखंड उपलब्ध असून काही संस्थांनी त्यावर कब्जा करून ग्रामस्थांकडून अनधिकृत पणे जादा भाडे आकारण्यात येते. तरी सदर भूखंड सिडकोकडून महापालिकेस मिळवून घेऊन प्रभाग क्रमांक १०५ मधील नागरिकांना गावकऱ्यांचे पारंपारिक सण तसेच सामाजिक कार्यक्रमासाठी माफक दरात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे.
मल निसारण वाहिन्या – नवी मुंबई शहरातील काही गावठाण भागात मल निसारण वाहिन्या वाढणाऱ्या लोक वस्तीमुळे बदलणे गरजेचे असल्याने त्याचा नियोजित प्रस्ताव म्हणून काम सुरू करावे.
पाणी समस्या – नवी मुंबई शहरातील घणसोली, ऐरोली, दिघा या विभागात दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की, या विभागात एमआयडीसी कडून होत असलेला पाणीपुरवठा कमी न करता या विभागात मोरवे धरणाचे पाणी मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी प्रयत्न करावे.
कंडोनिअम प्रकल्प – नवी मुंबई शहरामध्ये कंडोनियम (सिडको वसाहतीत ठरलेल्या) अंतर्गत शासनाने पूर्वी बंद केलेल्या कामांमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाब लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याची लाईन व मल निसारण वाहिन्या तातडीने बदलण्यात याव्यात. तसेच अंतर्गत पदपथ क्रिटीकरण करण्यात यावे.
विद्युत वाहिनी – दिघा परिसरातील रामनगर ईश्वर परिसरामध्ये ओवरहेड असलेल्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी प्रयत्न करावे.
रुग्णालयाची नव्याने निर्मिती – नवी मुंबई शहरातील ऐरोली मतदार संघातील घणसोली, ऐरोली, दिघा या परिसरातील लोकसंख्येत अधिक वाढ झाल्याने येथील रुग्णालय अपुरे पडत आहेत. कोविडमध्ये सुद्धा रुग्णालय अपुरे पडत असल्याने एकतर वाशी किंवा बेलापूर येथील रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत होता. त्यामुळे भविष्याचा विचार करून घणसोली विभागात एक सुसज्ज आत्याधुनिक पद्धतीच्या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावे.
स्टॉल परवाने -नवी मुंबई परिसरात चर्मकार समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या समाजातील बेरोजगारांना उदरनिर्वाहासाठी स्टॉल परवाना मिळवून देण्यासाठी या शहरातील वंचित गटे कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना स्टॉल मिळवून देण्यासाठी धोरण आखावे.
उड्डाणपूल – ठाणे बेलापूर मार्गावरील तुर्भे स्टोअर्स जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी तुर्भे स्टोअर्स ते जुईनगर या ठिकाणी एलिव्हेटेड उड्डाणपूल तयार करावा जेणेकरून होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल व नागरिकांचा प्रवास सुखकर होईल.
सानपाडा मैदान – सानपाडा सेक्टर १० येथील डी व्ही पाटील मास्तर मैदानात आर्चरी खेळासाठी महापालिकेमार्फत निविदा काढण्यात आली आहे. परंतु सदर मैदान हे सेक्टर १० मध्ये नागरिकांना खेळासाठी आणि सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी एकमेव मध्यवर्ती मैदान असल्याने स्थानिक नागरिकांनी देखील या मैदानात होणाऱ्या कामास विरोध दर्शविला आहे. आर्चरी खेळास नागरिकांचा विरोध नाही परंतु नागरिकांच्या मागणी नुसार या मैदाना पेक्षा मोठ्या म्हणजे सानपाडा ओरिएंटल कॉलेजच्या मागे सेक्टर- २ या मैदानात केल्यास नागरिकांना सोयीचे होईल.
नाले व गटार साफसफाई – येणारा पावसाळा लक्षात घेता कोणत्याही ठिकाणी पाणी तुंबू नये यासाठी नाले- गटार साफसफाईचे योग्य नियोजन करून करण्यात यावी व त्यावर लक्ष केंद्रित करावे जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही. सानपाडा मिलियन टॉवर मागील रेल्वे कारशेड समोरील गटारे पावसाळ्यापूर्वी साफसफाई करून घ्यावे. तसेच सानपाडा स्टेशन सेक्टर ३ व २ या लोकवस्तीत गेल्या अनेक वर्षापासून साफसफाईकडे दुर्लक्ष होत आहे ती योग्य रीतीने करून घेण्यात यावी.
वृक्ष छाटणी – पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील वाढलेल्या फांद्या छाटून घ्या जेणेकरून वादळामध्ये झाड मुळासकट पडू नये. तसेच धोकादायक असलेली झाडे महानगरपालिकेने उपटून काढावी याचे योग्य नियोजन जेणेकरून कोणतीही जीवित हानी होणार नाही.
रस्त्यावरील खड्डे – शहरातील होत असलेली विकास कामे त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे हे तात्काळ बुजवून घ्यावेत. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक सेक्टर ८ सानपाडा येथे दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत असतात त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे.
पंप हाउस – वाशी सेक्टर ८ अ व १० अ येथील होल्डिंग पाँड वरील धोकादायक झालेल्या पंप हाउस तोडून नवीन बांधणे. तसेच दिवाळे गाव सेक्टर ११ आणि १२ येथील होल्डिंग पाँड च्या पंप हाउस ची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन. चांगल्या स्थितीत सुरु करावे. जेणेकरून पावसाळ्यात होल्डिंग पाँड समुद्रामार्गे आलेल्या पाण्याचा साठा पंपा द्वारे बाहेर सोडता येईल.
ज्वेल ऑफ नवी मुंबई – या नवी मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी लाखो रुपये खर्च करून ज्वेल ऑफ नवी मुंबईची निर्मिती केली. या निसर्गरम्य परिसरात जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंग करण्याकरिता दररोज सकाळी व संध्याकाळी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. परंतु मध्यभागी असलेल्या तलावाच्या पाण्याच्या झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागते. भरती – ओहटीच्या वेळी तलावात पाणी आत बाहेर येणारा मेकॅनिकल गेट तुटलेला असल्याने तो बदलण्यात आलेला नाही. त्याचबरोबर करावे व नेरूळ गाव येथून येणाऱ्या ड्रेनेज लाईन एसटीपी प्लांट सुरू न केल्याने या ड्रेनेज लाईन घाण तलावात जाऊन पाणी दूषित होऊन गाळ साठला आहे. तो त्वरित काढण्यात यावा.
सायन्स पार्क – नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर १९ मध्ये नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या सायन्स पार्क इमारतीच्या कामाची स्थिती काय आहे ?
स्काय वॉक – ज्याप्रमाणे वाशी येथे नागरिकांसाठी स्कायवॉक उभारण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर कोपरखैरणे येथे सेक्टर ६ ते सेक्टर १८ गुलाब सन डेरी दरम्यान स्काय वॉक उभारल्यास नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कारण या परिसरात दाट वस्ती असल्याने रेल्वे स्थानकातून येणारी सर्व नागरिक याच मार्गाचा वापर करीत असतात. परंतु या ठिकाणी फेरीवाले व लांबचा वळसा मारून पलीकडे जावे लागते तो त्रास स्काय वॉक मुळे कमी होणार आहे.
या सर्व विषयांवर चर्चा करून आयुक्तांनी या सर्व समस्यांवर तोडगा कडून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले.