नवी मुंबई : जुईनगर सेक्टर 23 परिसरात पाऊसामध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याविषयी कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पाऊस आताच कुठे सुरू झाला आहे. महापालिका प्रशासनाकडून दरवर्र्षी पावसाळीपूर्व कामांचा गाजावाजा करण्यात येत असतो. पण पाऊस सुरू झाल्यावर ही कामे किती गांभीर्याने केली आहेत, हे लगेचच माहिती पडते. कालपरवापासून काही वेळाकरता पाऊस पडू लागला आहे. जुईनगर सेक्टर 23 परिसरात शिवशक्ती हॉटेलनजीक जाण्यायेण्याच्या रस्त्यावर पाणी तुंबले आहे. या ठिकाणी पाणी तुंबल्याने स्थानिक रहीवाशांना याच ठिकाणांहून ये-जा करावी लागत आहे. ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे लोकांच्या अंगावर पाणी उडत आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश द्यावेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचा उद्रेक होण्याची पर्यायाने साथीच्या आजारांचा सामना करावा लागण्याची भीती आहे. पहिल्याच थोड्याशा पावसात पाणी तुंबत असेल तर संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडल्यास काय चित्र असेल, याची कल्पनाही करवत नाही. समस्येचा उद्रेक होण्यापूर्वीच या ठिकाणी पाणी तुबणार नाही, पाणी वाहून जाईल, पाण्याचा निचरा होईल यासाठी संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.