सुवर्णा खांडगेपाटील : Nvimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘एमएमआरडीए’तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळाली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी (दि. १० जुलै) आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवास्थानी प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवान सोबत बैठक संपन्न झाली.
यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, यासंदर्भात एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली अशा एकूण १३२ मच्छीमार बांधवाना व ज्या ८२ मच्छीमार बांधवांना पहिला हप्ता प्राप्त झाला आहे त्यांनाही दुसरा हप्ता व तिसरा हप्ता अशी सर्वांना एक रकमी नुकसान भरपाई डी.बी.टीद्वारे थेट बँक खात्यात जमा झाली आहे.
आमदार मंदाताई म्हात्रे पुढे म्हणाल्या की, उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी सदरची प्रक्रिया अपूर्ण आहे, ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करून उर्वरित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देणार व माझा कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले. न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली ४ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली गाव येथील कोळी बांधव मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात म्हणून माझ्या मच्छीमार कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. तसेच मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळाले असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, युवा महामंत्री दत्ता घंगाळे, डोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कोळी, फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस व असंख्य कोळी बांधव व महिला उपस्थित होत्या.