सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर २ मधील नादुरूस्त व बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, पदपथ व अन्य कामांबाबत आपण सानपाडा-जुईनगर नोडमध्ये पाहणी अभियान राबवून कामांची पाहणी करावी यासाठी आम्ही आपणाकडे यापूर्वीच पाहणी अभियान करण्याची लेखी मागणी केली होती. आपल्या कार्यालयाकडून केवळ निवेदन फॉरवर्ड करण्यात आले, परंतु कार्यवाही झालीच नाही. आज सांयकाळनंतर सानपाडा सेक्टर २ परिसरात काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसून येत आहे. पथदिवे सर्वच बंद असल्याने अंधाराचा गैरफायदा घेत समाजातील विकृतांकडून महिलांची तसेच मुलींची छेडछाड अथवा अन्य गैरप्रकारही होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पावसामध्ये काही घटना घडल्यास कोणाला आवाजही जाणे शक्य नाही. अंधारात ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सानपाडा सेक्टर २ परिसरातील प्रियंका सोसायटीपासून ते निळकंठ टॉवरपर्यत बंद असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.