नवी मुंबई : शिष्यवृत्तीसाठी अर्ज करूनही संबंधित विद्यार्थ्यांना महापालिका प्रशासनाकडून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. पात्र असतानाही पालिका प्रशासनाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारणे ही बाब योग्य नसून पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे अशी मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिकेचे सामाजिक विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांच्याकडे केली आहे.
प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहीले आहे. त्यांनी कागदपत्रे जमा करूनही प्रशासनाकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. स्थानिक रहीवाशांनी ही बाब समाजसेवक गणेश भगत आणि स्थानिक माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर तात्काळ समाजसेवक गणेश भगत यांनी प्रभागामधील रहीवाशांशी संपर्क करून शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी बनवून पालिका मुख्यालयात जात सामाजिक विभागाचे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांची भेट घेतली आणि निवेदन सादर करत संबंधित समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
ज्यांची कागदपत्रे कमी आहेत, अर्जामध्ये त्रुटी आहेत, जे शिष्यवृत्तीच्या निकषात बसत नाही, त्यांना शिष्यवृत्ती देवू नका. परंतु जे विद्यार्थी पात्र आहेत., गरीब व गरजू आहेत. कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांना शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे. इतर प्रभागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करताना नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ मधील विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्तीच्या बाबतीत पालिका प्रशासन का अन्याय करत आहे, असा प्रश्न गणेश भगत यांनी यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित केला.
गणेश भगत यांच्याशी चर्चेदरम्यान भूमिका समजावून घेतल्यावर उपायुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी चौकशी करून या समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन समाजसेवक गणेश भगत यांना दिले.