नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात तातडीने वृक्षछाटणी करण्याची लेखी मागणी कॉंग्रेसचे वॉर्ड ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात पालिका प्रशासनाकडून वृक्षछाटणी अभियान आजतागायत राबविण्यात आलेले नाही. जुलै महिन्याची आज २० तारीख आहे. पावसाळीपूर्व कामाचा वृक्षछाटणी हा एक भाग असतानाही नेरूळ सेक्टर सहामध्ये वृक्षछाटणी करण्यास पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून आजवर चालढकल करण्यात आलेली आहे. जुन महिन्यातच वरूणा (सिडको सोसायटी) सोसायटी संरक्षक भिंतीलगत विक्रम बार ते दर्शन दरबार या अंर्तगत मार्गावर झाडाची फांदी पडून एका वाहनाचे नुकसान झाले होते. शिवम सोसायटीजवळील एमएसईडीसीच्या उपकेंद्राजवळील झाडे व पालिका समाजमंदिराजवळील झाडे पाहिल्यास फांद्या आज धोकादाययक स्थितीत व झुकलेल्या आहेत. या फांद्यांची वेळीच छाटणी न झाल्यास फांद्या पडून वाहनांची हानी होण्याची तसेच येथून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना इजा होण्याची शक्यता आहे. आपण सेक्टर सहामध्ये विक्रम बार ते समाजमंदीर अंर्तगत मार्ग, समाजमंदिर ते मेरेडियन सोसायटी अंर्तगत मार्ग या ठिकाणी व सेक्टर सहामध्ये अन्यत्र तातडीने वृक्षछाटणी करण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.