नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील पदपथावर असणाऱ्या झाडांच्या फांद्या नियमितपणे उचलण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड ८६चे अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुबईत संततधार स्वरूपात मुसळधार पाऊस पडत आहे. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील भागात नारळाच्या व अन्य झाडांच्या फांद्या वरून पडत असतात. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या फांद्या आणि गृहनिर्माण सोसायट्याच्या आवारात पडणाऱ्या फांद्या पादचारी व रहीवाशी पदपथावर आणून टाकत असतात. पदपतावर फांद्याचा कचरा पडल्याने रहीवाशांना पदपथावरून चालता येत नाही. त्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. दोन्ही बाजुला दुतर्फा वाहने उभी असल्याने रहिवाशांना वाहनांचा धक्का लागण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावरून जाताना साचलेले पाणी वाहनांमुळे अंगावर उडते. त्यामुळे नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील पदपथावर असलेल्या झाडांच्या फांद्या संबंधित दर दोन-तीन दिवसांनी पदपथावरून उचलल्यास स्थानिक रहीवाशांना पदपथावरून ये-जा करणे शक्य होईल. रस्त्यावरून चालणे टाळले जाईल, प्रभागाचा बकालपणाही संपुष्ठात येईल. पदपथावरील फांद्या वेळोवेळी उचलण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.