संदीप गणेश नाईक, हे नाव नवी मुंबईच्याच नाही तर ठाणे, महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यात आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात परिचित असे नाव आहे. काही दिवसापूर्वीच नवी मुंबई भाजप रथाच्या सारथीपदी अर्थात नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी संदीप नाईक यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली. अर्थात गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून संदीप नाईक हेच नवी मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त होणार अशी चर्चा होती, पण काही घटकांकडून शिरवणे गावातील डॉ. राजेश पाटील यांचे नाव पु्ढे केल्याने संदीप नाईक का डॉ. राजेश पाटील अशी चर्चा काही काळ रंगली. पक्षश्रेष्ठींनी अखेर संदीप नाईकांकडे नवी मुंबई भाजपची धुरा सोपविली.
अर्थांत संदीप नाईक यांना या पदाची धुरा सोपविताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी योग्य व्यक्तिची निवड केल्याचे महाराष्ट्राला दिसून येईल. संदीप नाईकांच्या २७ वर्षाच्या सामाजिक पटावर त्यांनी विद्यार्थी दशेपासून महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी संघटनेचेही कार्य सांभाळले आहे. संदीप नाईक हे मुळातच राजकारणी नाही. तत्कालीन परिस्थितीत राजकीय समीकरणाची जुळवाजुळव करण्यासाठी संदीप नाईकांना राजकारणात आणले गेले. या माणसाचा मुळात राजकारण हा पिंड नाहीच. एका नाण्याला दोन बाजू असतातच. संदीप नाईकरूपणी नाणे दोन्ही बाजूने कोणीही समर्थंक असो वा कट्टर विरोधकांनीही तपासून पाहिल्यास एका बाजूला उद्योजक व दुसऱ्या बाजूला समाजसेवक या दोन बाजूचे खणखणीतपणे पहावयास मिळतील.
राजकारण हा मुळी संदीप नाईकांचा पिंड नसल्याने त्याचा खरा फायदा नवी मुंबई शहराला आणि नवी मुंबईकरांना झालेला आहे. समाजसेवक असल्याने तळमळ व उद्योजक असल्याने सामाजिक कार्यावर त्यांच्या हस्ते त्यांच्याच खिशातून खर्च होणारा अफाट निधी याचा होणारा मिलाफ नवी मुंबई शहरासाठी उपयुक्तच ठरला आहे. जी माणसे अल्पावधीत भरारी मारतात, समाजाचे हित नि:स्वार्थीपणे जोपासतात, समाजातील अपप्रवृत्ती त्यांना अडथळे आणण्याचे व त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत असते. संदीप नाईकांच्या सामाजिक कार्याचा अश्व रोखणे शक्य नसल्याने अथवा त्याची बरोबरी करणे या काय आगामी शंभर जन्मातही शक्य नसल्याने संदीप नाईकांच्या वाटचालीत अडथळे आणण्याचे काम त्यांचे विरोधक २४*७ या धर्तीवर इमानेइतबारे अगदी प्रामाणिकपणे करतच असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी काही हितशत्रू असल्याने पडद्याआडून विरोधकांना सहकार्य करतच असतात. दिवसा बालाजी, क्रिस्टल नाईक परिसरावारासमवेत थांबायचे, त्यांच्या ओळखीच्या आपल्या अर्थकारणाच्या वाटचालीला आधार घ्यायचा आणि नाईक विरोधकांशीही मधुर संबंध ठेवायचे असे उद्योग काही झारीतील शुक्राचार्य करतच असतात. अर्थांत या घडामोडींची संदीप नाईकांना इंत्यभूत माहिती असते. परंतु ते कधीही कोणाला दुखवत नाहीत. प्रत्येकाला सुधारण्याची संधी देत असतात.
संदीप नाईक राजकारणी नसल्याने ते कधीही आश्वासन देण्याच्या भानगडीत अथवा वेळ मारून नेण्याचा प्रकार करत नाही. त्यांचे काम तात्पुरते अथवा क्षणिक नसते. कोणतेही काम कॉक्रिट स्वरूपाचे असते. समस्या घेवून येणाऱ्या माणसाचे काम होत असेल तर ते करतात अथवा होण्यासारखे नसेल तर स्पष्टपणे नकार देवून त्यातील अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देतात. स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईला केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर सातत्याने पुरस्कार मिळतच असतात. अनेक राजकीय व सामाजिक घटक अंगावर रेनकोट व हातात ग्लोव्हज घालून सफाई अभियान राबवितात. फेसबुक, व्हॉटसअप,ट्विटरवर फोटोसेशन करतात. पण खरी समाजसेवा व स्वच्छता अभियान राबवावे कसे हे संदीप नाईकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. संदीप नाईक हे मितभाषी असले तरी त्यांची कामे बोलकी असतात. काही वर्षापूर्वी ३ ऑगस्ट २००८ रोजी मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. ओहोटी असतानाही नाल्यात कचरा तुंबल्याने भरती नसतानाही खाडीमध्ये पाणी जाणे शक्य होत नसल्याने पाण्याचा निचरा होत नव्हता. वाशी सेक्टर १७ मध्ये पाणी साचले होते. वाशी सेक्टर १७ मध्ये अनेक राजकीय घटक भेटी देवून गेले. संदीप नाईक नुकतेच स्थायी समिती सभापती बनले होते. पायपीट करत त्यांनी सर्व पाहणी केली. शालांत परिक्षेचे (बोर्ड), विश्वज्योरती हॉटेलसमोरील व सेंट लॉरेन्स शाळेजवळील नाल्यापाशी संदिप नाईक थांबले. मागचा-पुढचा विचार न करता अंगावरच्या कपड्यानिशी नाल्यात उतरले व हाताने तुंबलेला कचरा काढण्यास सुरूवात केली. संदीप नाईक स्वत: उतरल्यावर त्यांच्या सभोवताली असणारेही नाल्यात उतरले. त्यावेळी गळ्याएवढ्या पाण्यात संदीप नाईक स्वत: उतरून नालासफाई करत असलेले नवी मुंबईकरांनी जवळून पाहिले. कारण त्यांना नि:स्वार्थी जनसेवेचे बाळकडू लहान वयातच माई आणि दादांकडून मिळाले होते. यावेळी त्यांनी कोणतेही फोटोसेशन केले नाही. स्वत:चा एकही फोटो काढला नाही. त्यावेळी सानपाडा पामबीच भागातील मनसेचे शिष्टमंडळ एक काम घेवून तिथे आले हाते. आजही ते त्या घटनेचे साक्षीदार म्हणून उपलब्ध आहेत.
महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात संदीप नाईक नगरसेवक म्हणून आले. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभागृहात पूर्णपणे बहूमत होते. दोन्ही वेळेस महापौरपद महिलांसाठी आरक्षित होते. संदीप नाईकांना पाच वर्षे स्थायी समिती सभापती होण्यापासून कोणीही अडविले नसते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून त्यांना विचारणाही झाली होती. पण त्यांनी विनम्रपणे नकार देत मला अनुभव नाही, प्रथम मला स्थायी समितीत सदस्य म्हणून अभ्यास करण्याची संधी द्या असे सांगितले. दोन वर्षे सदस्य म्हणून स्थायी समितीच्या कारभाराचा अभ्यास केल्यावर त्यांनी सलग तीन वर्षे स्थायी समिती सभापतीपदाची धुरा सांभाळली. स्थायी समिती सभापतीचे काम केवळ वातानुकूलित कार्यालयात बसणे अथवा स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकांचे संचलन करणे इतपतच मर्यादीत नसते याचे आपल्या कृतीतून दाखवून देताना संदीप नाईकांनी सर्वच राजकीय घटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून दिले. पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेताना त्यांनी ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबविताना नाले-गटारे तिथे जावून सफाईचा आडावा घेतला. प्रत्येक प्रभागाप्रभागात जावून लोकांशी सुसंवाद साधला, चर्चाही केली. त्यांच्या समस्या व असुविधा जाणून घेतल्या. नवी मुंबईतल्या प्रभागाप्रभागात अनेकदा पायपीट केल्याने नवी मुंबईतील कानाकोपरा पायाखालून घालणारे संदीप नाईक हे एकमेव नेतृत्व असल्याचे नवी मुंबईकर जाणून आहेत, त्यांनी अनुभवलेही आहे.
लोक केलेल्या कामाची पोचपावती देतात. आपल्या कामातूनच जनाधार निर्माण करण्याची संदीप नाईकांची कार्यप्रणाली आहे. २००९ ला बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे पाच विधानसभा मतदारसंघात विभाजन झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांनी ऐरोली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. लोकांशी थेट संपर्क, सुसंवाद व ‘सभापती आपल्या अंगणात’ या अभियानाच्या माध्यमातून केलेली पायपीट यांचा मिलाफ झाला. रथी-महारथींना पराभूत करणे संदीप नाईकांना अवघड केले नाही. जनतेच्या प्रेमाने व संदीप नाईकांच्या आजवरच्या कार्यांनीच ती किमया केली. अभ्यासू प्रवृत्ती असल्याने संदीप नाईकांनी अधिवेशन कालावधीत २००९ ते १०१४ या काळात संदीप नाईकांनी एकही दिवस अधिवेशनाला दांडी मारली नाही. अधिवेशन काळात आमदार म्हणून पहिल्या टर्ममध्ये शंभर टक्के हजेरी लावणारे आमदार अशी संदीप नाईकांची आजही महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे. आमदार झाल्यावरही जमिनीवर पाय ठेवून वावरणे, जनतेची कामे करणे आणि जनसंपर्क या संदीप नाईकांच्या कार्यप्रणालीत तसूभरही बदल झालेला नाही. २०१४ ची विधानसभा निवडणूक ही राजकारणात वादळी ठरली. मोदी पर्वाच्या राष्ट्रीय राजकारणाची ती नांदी होती. सर्व वातावरण मोदीमय झाले होते. या वावटळीत असंख्य राजकीय रथी-महारथी पराभूत झाले होते. भाई पडणार, दादा येणार अशी कुजबुज नाईकांच्या छावणीतील कोअर कमिटीतॅील सदस्यही खासगीत आपआपसात पडद्याआड चर्चा करताना करत होते. (याला केवल अपवाद संदीप नाईकांचे मित्र संदीप खांडगेपाटील हे ठरणार. ऐरोली आम्ही काढणार हे वाक्य संदीप खांडगेपाटील पहिल्या दिवसापासून सांगत होते. मतदान झाल्यावर अर्ध्या तासातच ऐरोली आम्ही ८ ते ११ हजारांनी जिंकली, उद्यापासून कामे घेवून असा व्हॉटसग्रुपवर लगेच टाहोही संदीप खांडगेपाटलांनी फोडला होता. त्याग्रुपवर तत्कालीन भाजपचे उमेदवार वैभव नाईकही होते. त्या त्या व्हॉटसग्रुपवर सन्नाटा होता आणि आम्ही ऐरोली काढली, उद्यापासून आमदारांकडे कामे घेवून या असे जाहिरपणे सांगणारे संदीप खांडगेपाटील एकमेव होते.) परंतु ऐरोलीचा गड संदीप नाईकांनी राखला.
कोरोना महामारीच्या काळात अनेक राजकीय व सामाजिक घटक जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले. अन्नदान, मास्कवाटप, रूग्णवाहिका मदत आदी कामे करताना आपल्या कार्याचे फोटोसेशनही त्यांनी इमानेइतबारे केले. कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईत सर्वांधिक कार्य संदीप नाईकांनी करूनही एकही फोटोसेशन केले नाही. कोरोना महामारी सुरुवातीच्या काळात अफवांमुळे भीतीच अधिक होती. त्यामुळे प्रभागाप्रभागात कोरोना महामारी नियमांचे पालन करताना प्रभागाप्रभागात जनतेच्या भेटीगाठी घेत जनतेला दिलासा देण्याचे काम केले. रूग्णांना उपचार मिळावे, व्हेन्टिलेटर मिळावे, कमी खर्चात उपचार व्हावे, सिडको एक्झिबिसनसह महापालिकेच्या सर्वच कोव्हिड सेंटरच्या परिस्थितीचा तासातासाने आढावा घेणे, जनतेला मोफत मास्क देणे, इंजेक्शन उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी स्वत:च्या खिशाला झळ दिली. कोरोना महामारीत नोकरी-उद्योग ठप्प झाल्याने राजाचाही रंक होण्याची वेळ आली होती. अशावेळी संदीप नाईकांनी नवी मुंबईच्या प्रभागाप्रभागात गरजू लोकांसाठी तब्बल चार ते पाच वेळा धान्य उपलब्ध करून दिले . प्रभागाप्रभागातील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांन निर्देशही दिले. कोरोना महामारीत संदीप नाईकांचे कार्य खऱ्या अर्थांने अलौकीक होते. हे सर्व करूनही हा माणूस नामानिराळा राहीला, प्रसिध्दीपासून लांबच राहीला. एक फोटोही काढला नाही. कोठे बातमीही छापून आणली नाही.
भाजपने योग्य माणसाच्या हाती नवी मुंबईच्या संघटनात्मक नेतृत्वाची धुरा सोपविली आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना चमकेशगिरी नाहीतर ठोस काम करावे लागणार आहे. कारण हा माणूस फोटोवर अथवा वर्तमानपत्रातल्या बातम्यांवर तसेच चमकेशगिरीला प्राधान्य देणारा नाही. आता भाजप पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या वारंवार बैठका होतील. प्रभागाप्रभागातील कामांचा आढावा घेतला जाईल. काम करणाऱ्याला शाबासकी देवून कामासाठी प्रोत्साहित केले जाईल. काम न करणाऱ्याला काम करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. काम करणाऱ्यांसाठी संदीप नाईक हे नेतृत्व उपलब्ध झाले आहे. याची पोचपावती भाजपला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नक्कीच मिळेल.
अॅड. महेश जाधव
कल्याण