Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
स्वच्छ आणि सुंदर शहर अशा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई शहराच्या स्वच्छता कार्यात अगदी सुरवातीपासूनच महत्वाचे योगदान देणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संघटनशील स्वभाव यांचा नवी मुंबईच्या गौरवात महत्वाचा वाटा असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीम.सुजाता ढोले यांनी सांगितले.
माहे जुलै महिन्याच्या अखेरीस श्री.राजेंद्र सोनावणे विहित वयोमानानुसार नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून सेवानिवृत्त होत असून त्या निमित्त घनकचरा व्यवस्थापन विभाग व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या वतीने वारकरी भवन, सीबीडी बेलापूर येथे सेवानिवृत्त शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे. उप मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. विनायक जुईकर, स्वच्छता अधिकारी सर्वश्री सूर्यकांत म्हात्रे, राजेंद्र इंगळे, सुधीर पोटफोडे, विजय पडघन, सुभाष म्हसे, सतिश सनदी आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे हा कार्यक्रम ‘शून्य कचरा उपक्रम (झिरो वेस्ट इवेन्ट)’ या संकल्पनेनुसार साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वापरले गेलेले सर्व साहित्य हे ‘थ्री आर’ नुसार होते.
याप्रसंगी बोलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे यांनी श्री. राजेंद्र सोनावणे यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि अथक मेहनत घेण्याची तयारी यावर अनेक प्रसंगांची उदाहरणे देत भाष्य केले. सन 2002 मध्ये राज्य शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरु केले. त्यानंतर केंद्र सरकारने सन 2015 मध्ये स्वच्छ भारत अभियान सुरु केले. यामध्ये नवी मुंबई राज्यात नेहमीच प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले असून नवी मुंबईचे देशातील स्वच्छता मानांकनही सातत्याने उंचावत राहिले आहे. यामध्ये श्री. राजेंद्र सोनावणे यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी म्हणून केलेल्या कामाचा महत्वाचा वाटा असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी श्री.राजेंद्र सोनावणे यांच्यासोबत काम करतानाच्या अनेक आठवणी व प्रसंग सांगितले. त्यांच्या पत्नी सौ. ललिता सोनावणे, मुलगा श्री. उमेश सोनावणे व कामगार नेते श्री.रवींद्र सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. राजेंद्र सोनावणे यांनी सेवा कालावधीत स्वच्छता विभागाप्रमाणेच काही काळ नेरूळ विभाग अधिकारी पदाचीही जबाबदारी निभावली, मात्र कोणत्याही पदावर कामाला महत्त्व देऊन जे जे काम सोपविण्यात आले ते प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न केला असे सांगत नवी मुंबई महानगरपालिका आहे म्हणून आपण आहोत हे न विसरता आपल्यामधील सर्वोत्तम देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे सहकारी, अधिकारी – कर्मचारी यांना आवाहन केले.