Navimumbailive.com@gmail.com – संपर्क : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास ९ ऑगस्टपासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिला आहे.
ठोक मानधनावर पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या असुविधांबाबत, त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यापूर्वीही महापालिका आयुक्तांना वांरवार लेखी निवेदने दिली आहेत. शिष्टमंडळासमवेत प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करताना चर्चेदरम्यान त्यांच्या समस्यांचे गांभीर्यही रविंद्र सावंत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्नही केलेला आहे. ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधांबाबत हे इशारापत्र सादर करताना समस्यांचे निवारण न झाल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन करणार असल्याचा व प्रशासनाने सातत्याने निवेदने देवून, शिष्टमंडळासमवेत भेटीगाठी घेवून, चर्चा करूनही समस्या निवारणास विलंब केल्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्टपासून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे व असुविधांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
ठोक मानधनावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे अत्यल्प वेतन असल्याने त्यांना बॅका, पतसंस्था अथवा अन्य तत्सम वित्तीय संस्था या कर्मचाऱ्यांना सहजासहजी कर्ज देत नाही. त्यामुळे त्यांना कुटूंबाच्या गरजा भागविण्यासाठी, आरोग्य व अन्य सुविधांसाठी खासगी सावकारांकडे व्याजदराने पैसे मिळविण्यासाठी हात पसरावे लागतात आणि खासगी सावकारांचे व्याजदर कसे असतात, हे कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यावर मंत्रालयीन पातळीवर या कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा प्रस्ताव पाठविण्यात आला. राज्य सरकारने याबाबतीत पालिका स्तरावर निर्णय घेण्यास कळवूनही प्रशासकीय पातळीवर अजून याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. ठोक मानधनावरील काही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करताना एक-दोन महिन्यापूर्वी थेट ३५ हजार रूपये वेतन केले. केवळ ठराविक वर्गावर कृपा दाखविण्याचे सौजन्य दाखविण्याऐवजी ठोक मानधनावरील सर्वच कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणे आवश्यक होते, परंतु महापालिका प्रशासनाने तसे केले नसल्याचे खेदाने नमूद करावे लागत असल्याची नाराजी रविंद्र सावंत यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका प्र्रशासनात परिवहन उपक्रमाचे चालक, वाहक व अन्य कर्मचारी, घनकचरा विभागातले कर्मचारी, आरोग्य विभागातले कर्मचारी, महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याचे, शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही तसेच अन्य व्यवस्थापणातील कर्मचाऱ्यांना ठोक मानधनावर पालिका प्रशासनाने सेवेत ठेवले आहे. ज्या जागांची खरोखरीच प्रशासनाला गरज आहे, त्या जागांवर पालिका प्रशासनाने कायमस्वरूपी भरती केली पाहिजे. ठोक मानधनावर काम करणारे अनेकजण कायम सेवेच्या आशेने काम करताना आता निवृत्तीच्या मार्गाला लागले आहेत. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची समस्या गंभीर आहे. या कर्मचाऱ्यांच्या समस्यानिवारणासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांना यापूर्वीही याच विषयानुरूप २२ फेब्रुवारी २०२३, २ मे २०२३ आणि ९ जुन २०२३ रोजी दिलेली लेखी निवेदने सादर केलेली आहेत आणि प्रत्यक्ष भेटून शिष्टमंडळासमवेत चर्चांही केलेली आहे. २ मे २०२३ रोजी झालेल्या चर्चेदरम्यान आपण ३१ मे २०२३ पर्यंत ठोक मानधनाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आपण आश्वासन दिले होते. परंतु त्या आश्वासनाची आपणाकडून आजतागायत पूर्तता झालेली नाही. त्यानंतरही आपणास ९ जुन २०२३ रोजी भेटून निवेदन सादर केले होते. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे पालिका प्रशासन गांभीर्यांने पाहत नसल्याने कामगारांसमवेत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही रविंद्र सावंत यांनी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ व अन्य समस्यांबाबत उपोषणाचा इशारा दिला असताना महापालिका आयुक्तांनी १५ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रशासन उपायुक्तांनी लेखी पत्र देताना उपोषण न करण्याचे आवाहन करताना ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे त्यात नमूद केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना आम्ही उपोषण स्थगित केले होते. परतु समस्या सोडविण्यासाठी, वेतनवाढीसाठी प्रशासनाकडून आजतागायत कार्यवाही झालेली नाही. गरोदरपणाच्या काळात ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून रजाही देण्यात येत नाही. कामाच्या ठिकाणी येताना अथवा कामावरून घरी जाताना अपघात झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही अथवा उपचाराचा खर्चही दिला जात नाही. पूर्वी कर्मचाऱ्यांना पीएफही दिला जात नव्हता. आम्ही इंटकच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यावर प्रशासनाने पीएफ देण्यास सुरुवात केली असली तरी या कर्मचाऱ्यांना ईएसआयची सुविधा दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांना एकतर समान कामाला समान वेतन द्या अथवा एकरकमी ४० हजार वेतन देण्यास सुरूवात करा. या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत, असुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही प्रशासन समस्येचे गांभीर्य जाणून घेत नाही. कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधांबाबत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर तोडगा न काढल्यास ९ ऑगस्ट २०२३ पासून ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधत आम्ही महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहोत. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ व्हावी, हीच नवी मुंबई इंटकची प्रमुख मागणी आहे.या निवेदनातून ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मुदत देत आहोत. या कालावधीत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण न झाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले जाईल व मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांसमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा रविंद्र सावंत यांनी दिला आहे.