Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये येणाऱ्या कमी दाबाच्या पाणी समस्येचे तात्काळ निवारण करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे दि. २७ जुलै रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे.
यापूर्वीही याच परिसरातील कमी दाबाच्या पाणी समस्या निवारणासाठी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांना ६ जुलै २०२३ रोजी लेखी निवेदन सादर केले होते. तथापि आयुक्त कार्यालयाकडून निवेदन फॉरवर्ड झाले. परंतु संबंधितांकडून काहीही कार्यवाही न झाल्याने विद्याताई भांडेकर यांनी आज पुन्हा पालिका आयुक्तांना निवेदनस सादर केले.
जुईनगर सेक्टर २३ हा पूर्णपणे सिडको वसाहतीचा परिसर आहे. यामध्ये अल्प, अत्यल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी राहतात. या परिसरातील साई सागर सोसायटी, अमान सोसायटी, सूखसागर सोसायटी, महेश मिष्टान हॉटेलच्या सभोवताली असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना शनिवार, दि. १ जुलैपासून कमी दाबाने व कमी वेळेपुरताच महापालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा होत आहे. पाऊस पडत असतानाही व नवी मुंबईकरांच्या मालकीचे मोरबे धरण असताना जुईनगरवासियांना कमी दाबाने व कमी वेळेपुरता पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, ही शोकांतिका आहे. स्वमालकीचे धरण असतानाही जुईनगरवासियांनी टॅकरचे पाणी पावसाळ्यात विकत घ्यायचे का? असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे. पाण्यामुळे रहीवाशांना विशेषत: महिला वर्गाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. आपण समस्येचे गांभीर्य जाणून घेता लवकरात लवकर या समस्येचे निवारण करून जुईनगर सेक्टर २३ मधील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली आहे.