Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था, मुंबई यांच्या वतीने थेट नियुक्त सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी (वाणिज्य) यांच्या ५० प्रशिक्षण अधिकारी समुहाने आज नवी मुंबई महापालिकेचा अभ्यास दौरा करीत नवी मुंबई महापालिकेने पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रकल्प व कामांचे मुक्तकंठाने कौतुक केले.
देशातील अत्याधुनिक नागरी सुविधा, प्रकल्प असणारे सुनियोजित शहर ही नवी मुंबईची ओळख असून देशीपरदेशी अनेक अभ्यासगट, पर्यावरण व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला भेटी देत असतात. अशाच प्रकारे सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी (वाणिज्य) म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा ५० अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून त्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरणविषयक प्रकल्पांच्या प्रत्यक्ष पाहणीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था, मुंबई यांच्या वतीने विनंती करण्यात आली होती. त्यास नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली. त्यानुसार या पर्यावरण प्रशिक्षण दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४५ प्रशिक्षणार्थींसोबत उपस्थित क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेचे निवृत्त संचालक शिव कामेश्वरन तसेच वरिष्ठ लेखा परीक्षण अधिकारी सुंदर रामकृष्णन यांचे नवी मुंबई महापालिकेमार्फत स्वागत करण्यात आले. यावेळी नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, कार्यकारी अभियंता अजय संख्ये आदी अधिकारी उपस्थित होते.
या अभ्यास गटाने नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाला भेट देऊन स्वत:च्या मालकीचे धरण असणारी महापालिका म्हणून नवी मुंबईची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टची माहिती जाणून घेऊन पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा उद्योगसमुहांमध्ये वापर करून पिण्याच्या पाण्याची बचत करणाऱ्या व महापालिकेला महसूल मिळवून देणाऱ्या वेगळ्या प्रकल्पाचे कौतुक केले. नवी मुंबई हे भविष्याचा अंदाज घेऊन पावले उचलणारे शहर असल्याचे मत अभ्यासगटाचे प्रशिक्षक तसेच बहुतांशी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.