९ ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधत पामबीच मार्गालगत नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बाजूला ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यानिवारणासाठी इंटकप्रणित महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्यावतीने बेमुदत उपोषण पुकारण्यात आले होते. या आंदोलनाला विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, कामगारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे सर्वसामान्य नवी मुंबईकरांनीही उपोषणस्थळी भेट देत या उपोषणाच्या आंदोलनाला आपले समर्थन जाहिर केले. महाराष्ट्र राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेटिवारही गेल्या काही दिवसांपासून या आंदोलनाच्या तयारीवर लक्ष ठेवून होते. पालिका प्रशासनाने उपोषण होवू न दिल्यास मी स्वत: कामगारांसमवेत रस्त्यावर उतरून पालिका मुख्यालयासमोर उपोषण करेल अशी वड्डेटिवारांनी काही दिवसापूर्वी तंबीच दिल्याने वातावरण ढवळून निघाले होते.
ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधत कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत सकाळीच उपोषणाला बसले. कामगार वर्गही उपोषणात सहभागी झाला. पालिका प्रशासनाने ३१ ऑगस्टपर्यत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने व दस्तुरखुद्द राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते वड्डेटिवारांनीच आयुक्तांशी चर्चा केल्याने कामगारांना उपोषणाची सांगता झाली.
००० ००००
- या उपोषनाने काय साध्य झाले?
पालिका प्रशासनात वर्षानुवर्षे अन्याय सहन करत आला दिवस ढकलणाऱा कामगार संघठीत झाला. आपल्यासाठी कोणीतरी लढतोय, रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय, उपोषण करतोय हे रविंद्र सावंत यांच्या माध्यमातून कामगारांना जवळून पहावयास मिळाले. अनुभवयास मिळाले. आजवर कंत्राटी, ठोक तसेच कायम कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पालिका मुख्यालय ते मंत्रालय यादरम्यान गेली काही वर्षे हेलपाटे मारणारे कामगार नेते रविंद्र सावंत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू शकतात, आंदोलन करू शकतात हे कामगारांना जवळून अनुभवयास मिळाले. कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. जोपर्यत कामगार नेता रस्त्यावर उतरत नाही, आंदोलन करत नाही, उपोषण करत नाही, तोपर्यत कामगारांना त्या नेत्याविषयी कधीही आपुलकी वाटत नाही, जिव्हाळा निर्माण होत नाही. आजवर कामगारांसाठी गेल्या काही वर्षात कामगार नेते रविंद्र सावंत यांनी मंत्रालय ते महापालिका खुप पाठपुरावा केला असेल, अधिवेशनात प्रश्नही मांडले असतील, पण आज जे उपोषणामुळे कमविले, ते त्यांना मागील काही वर्षात कमविता आले नाही. या आंदोलनातून रविंद्र सावंत यांनी कामगारांचा विश्वास कमविला. कामगारांच्या डोळ्यात रविंद्र सावंत या नेतृत्वाविषयी एक आपुलकी व एक जवळीक असलेली चमक पहावयास मिळाली.
००००
आंदोलनाची वेळ का आली?
कामगार नेते रविंद्र सावंत हे गेल्या काही वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी लेखी पाठपुरावा करत होते. प्रशासनदरबारी निवेदनांचा रतीब घालत होते. शिष्टमंडळ नेवून पालिका आयुक्तांशी वारंवार चर्चा करत होते. परंतु आश्वासनांशिवाय आजवर रविंद्र सावंत व कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडत नव्हते. कोणतीही क्रांती होण्यासाठी अथवा ठिणगीचा उद्रेक होण्यासाठी कोणतेही एक कारण पुरेसे असते. असंतोषाचा ज्वालामुखी आधीच धुमसत होता. फक्त ठिणगी पडण्याचा अवकाश होता. महापालिका प्रशासनाच्या विविध आस्थापनेत ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्न प्रलंबित असताना पालिका प्रशासनाने केवळ ठोक मानधनावरील काम करणाऱ्या परिचारिकांचेच वेतन वाढविले. अर्थांत हे सहजासहजी घडले नाही. परिचारिकांचा पगार वाढविण्यासाठी एका मातब्बर राजकीय घटकांने आपली ताकद खर्ची केली, राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली. त्या मातब्बराच्या प्रभावापुढे पालिका प्रशासनाला नमती भूमिका घ्यावी लागली. केवळ आणि केवळ परिचारिकांमधील एका कर्मचाऱ्यामुळे सर्वच परिचारिकांचे ‘चांगभले’ झाले व ठोक मानधनावर काम करणाऱ्या सर्वच परिचारिकांना अच्छे दिन आले. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ कधीही लपून राहत नाही. ‘मेरी कमीजसे उसकी कमीज अच्छी कैसी’ ही भावना ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येवू लागली. त्यातून आंदोलन करण्याची ठिणगी पडली. पालिका प्रशासनाच्या तिजोरीत अडच हजार कोटींच्या ठेवी असणारी गर्भश्रीमंत महापालिका असा दुजाभाव कसा करू शकते? असा प्रश्न ठोक मानधनावरील कर्मचारी आपसात विचारू लागले. ठोक मानधनावरील परिचारिकांच्या वेतनात वाढ होवू शकते, मग वर्षानुवर्षे काम करणाऱ्या आम्ही कर्मचाऱ्यांनी काय घोडे मारले, असा संतप्त प्रश्न ठोक मानधनावरील कर्मचारी पालिका अधिकाऱ्यांना तसेच कामगार नेत्यांना विचारू लागले आणि तेथेच आंदोलनाची ठिणगी पडली. बस झाल्या चर्चा, वाटाघाटी, आता संघर्षासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय कामगार नेते रविंद्र सावंत यांनी कामगारांशी चर्चा करून घेतला व त्यातूनच हा उपोषणाचा घाट घातला गेला.