नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील राजमाता जिजाऊ उद्यानात शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी कॉंग्रेस पक्षाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाबात नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावचा समावेश असलेल्या प्रभाग ८६चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनातून दिली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान व नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यानात लाकडे, फांद्या व अन्य कचरा विखुरलेला आहे. उद्यान व अन्यत्र टप्याटप्प्याने स्वच्छता अभियान राबविण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्हाला महापालिका प्रशासनाचे माफक सहकार्य हवे आहे. या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ आम्ही शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत करत आहोत. या वेळेत जमा झालेला सर्व कचरा आम्ही उद्यानाच्या कोपऱ्यावर असलेल्या शौचालयालगतच्या पदपथावर जमा करू. त्याचे फोटोही आपल्या व्हॉटसअपवर पाठवू. आपण केवळ आपल्या कर्मचाऱ्यांना हा कचरा तेथून उचलण्याचे निर्देश द्यावेत. आम्ही सहा ते सात मित्र मिळून हया अभियानाचा शुभारंभ करत आहोत. यात कोणतीही चमकेशगिरी अथवा स्टंटबाजी नाही. जिथे राहतो, तेथील स्वच्छतेत योगदान द्यावे, हाच हेतू आहे. आपण केवळ संकलित केलेला कचरा हटविण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी जीवन गव्हाणे यांनी केली आहे.
जीवन गव्हाणे यांनी स्वच्छता अभियानाचे बॅनर व्हायरल करताच व पालिका आयुक्तांना निवेदन देताच काही मिनिटातच पालिका कर्मचारी उद्यानात सफाई करताना कित्येक महिन्यानंतर पहावयास मिळाले.