गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण अभियान राबविण्याची लेखी मागणी प्रभाग ८५च्या माजी नगरसेविका व नवी मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ३४ मध्ये सारसोळे गाव, कुकशेत गाव, नेरूळ सेक्टर ६, ८, १० या परिसराचा समावेश होत आहे. गेली तीन महिने पडत असलेल्या पावसामुळे या परिसरात साथीच्या आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. साथीच्या आजारामध्ये मलेरिया व डेंग्यूच्या रूग्णांचा अधिक समावेश आहे. डासांच्या उद्रेकामुळे साथीच्या आजारांचा उद्रेक झाला आहे. रुग्ण खासगी दवाखाने व खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने पालिका दरबारी या रूग्णांची कागदोपत्री नोंद होत नाही आणि साथीच्या आजारांचे गांभीर्य पालिका प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही. डासांमुळे रहीवाशी व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. साथीच्या आजारांना नियत्रंणात आणण्यासाठी डास निर्मूलन मोहीम व्यापक प्रमाणावर राबविणे आवश्यक आहे. डासांचा उपद्रव संपुष्ठात आल्यास साथीच्या आजारांवर नियत्रंण मिळविणे सहज शक्य आहे. आज प्रभाग ३४ मधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये, चाळींमध्ये तसेच एलआयजी परिसरात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण पहावयास मिळत आहे. साथीच्या आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात, गावागावातील गल्लोगल्लीत तसेच नेरूळ सेक्टर आठ व दहामधील एलआयजी वसाहतींमधील कानाकोपऱ्यात सातत्याने धुरीकरण अभियान राबविणे आवश्यक आहे डासांचा उद्रेक नियत्रंणात न आल्यास साथीच्या आजारांचा स्फोट होण्याची भीती आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रभाग ३४ मधील कानाकोपऱ्यात पालिका प्रशासनाने धुरीकरण अभियान सातत्याने व्यापक प्रमाणावर राबविण्याची मागणी सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.