नवी मुंबई : दहीहंडी उत्सव हा नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. माजी महापौर तुकाराम नाईक यांच्या वनवैभवच्या दहीहंडीपासून भिमाशंकरच्या रविंद्र इथापेंच्या दहीहंडीपर्यत सर्वच दहीहंडी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण कल्याण-डोंबिवलीपर्यत गोविंदा पथकांपर्यत चर्चिल्या जात होत्या. नेरूळ सेक्टर ८ मधील शिवसेनेच्या रतन मांडवेंच्या सलग दहीहंडी उत्सवही नेरूळ नोडमध्ये नावाजला जायचा. कोरोनानंतर नवी मुंबई शहरातील आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या एका कट्टर निष्ठावंत समर्थंक पांडुरंग आमले यांच्या सानपाडा भाजपची दहीहंडी गोविंदा पथकांमध्ये आकर्षणाची बाब बनली आहे. यंदाही पांडुरंग आमले यांनी आयोजित केलेली सोन्याची दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये कमालीची चुरस रंगणार आहे.
सानपाडा सेक्टर ८ मधील हुतात्मा बाबु गेनू मैदानावर गेल्या तीन वर्षांपासून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे समर्थक, निष्ठावंत अनुयायी तसेच मानसपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांडुरंग आमले दहीहंडी उत्सवाचे व्यापक प्रमाणावर आयोजन करत आहेत. दरवर्षी लाखो रूपयांच्या बक्षिसांची रेलचेल असते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरण, डोंबिवली भागातून मोठ्या संख्येने गोविंदा पथके या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी येत असतात.
याही वर्षी व्यापक प्रमाणावर पांडुरंग आमले व भाजप प्रभाग क्रमांक ३०च्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून ६ लाख ६६ हजार ६६६ रूपयांच्या बक्षिसांची रेलचेल आहे. भाजपच्या आमदार मंदाताई म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होणार आहेत. सिनेमा क्षेत्रातले, टीव्ही क्षेत्रातले तसेच रिलवाले अनेक कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. या उत्सव यशस्वी करण्यासाठी पांडुरंग आमलेंसह भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, पांडुरंग आमलेंचा मित्र परिवार, आयोजनात सहभागी असलेले साईभक्त सेवा मंडळ परिश्रम करत आहेत. या उत्सवात गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उत्सवाचे आयोजक पांडुरंग आमले यांनी केले आहे.