सुवर्णा पिंगळे – खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई :‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग २.० स्पर्धा’ जाहीर करण्यात आली असून मागील वर्षी देशातील मोठया शहरांमध्ये सर्वाधिक युवक सहभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त नवी मुंबई शहर आपला पहिला नंबर कायम राखण्यासाठी सज्ज झाले असून ‘नवी मुंबई इको नाईट्स’ या नवी मुंबई शहराच्या संघाच्या बोधचिन्ह नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ आणि इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ सप्टेंबर या राष्ट्रव्यापी सेवा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून ‘युथ वर्सेस गार्बेज’ अर्थात ‘कचऱ्याविरोधातील लढाईत युवकांचा सहभाग’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत असे अभिप्रेत असल्याचे सांगत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका या स्पर्धेसाठी सज्ज असून मागील वर्षीपेक्षा आपण अधिक उत्तम कामगिरी करु अशी खात्री आयुक्तांनी दिली.
मागील वर्षी देशभरातील १८०० शहरे यामध्ये सहभागी झाली होती व नवी मुंबईला सर्वाधिक युवक सहभागाचा बहुमान लाभला होता. यावर्षी ४००० हून अधिक शहरे सहभागी झाली असून हे आव्हान मोठे असले तरी आपण त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास नवी मुंबईकर स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या उत्साहाच्या बळावर आयुक्तांनी व्यक्त केला.
नवी मुंबईचे भूषण असलेले जगप्रसिध्द संगीतकार गायक पद्मश्री शंकर महादेवन हे नवी मुंबई इको नाईट्स संघाचे कर्णधार असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण ही कचऱ्याविरोधातील लढाई जिंकू असे आयुक्तांनी ठामपणे सांगितले.
‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून १२ सप्टेंबर रोजी बोधचिन्ह अनावरण, १३ सप्टेंबर रोजी सोसायट्यांना भेटी देत स्वच्छताविषयक जनजागृती, १४ सप्टेंबर रोजी तृतीयपंथीय नागरिकांमार्फत अभिनव पध्दतीने स्वच्छता जनजागृती तसेच स्वच्छताकर्मींची दहीहंडी, १५ सप्टेंबर रोजी एकाच वेळी नवी मुंबईतील सर्व शाळांमध्ये लाखो विदयार्थ्यांची स्वच्छ चित्रकला स्पर्धा, १६ सप्टेंबर रोजी मॉलमध्ये जनजागृती त्याचप्रमाणे १७ सप्टेंबर रोजी सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात त्या त्या ठिकाणच्या मध्यवर्ती स्थळी स्वच्छतेचा सामुहिक शपथ ग्रहण कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.
या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात स्वच्छतेची चळवळ उभी राहावी व स्वच्छतेची लाट सर्वत्र पसरावी यादृष्टीने १७ सप्टेंबरला बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात निश्चित केलेल्या ठराविक ठिकाणी सकाळी ८ वाजता सर्व नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्याच्या एकाच वेळी आठ कार्यक्रमांची आखणी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आलेली आहे.
यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी व शिक्षक, युवक, लोकप्रतिनिधी, महिला बचतगट व महिला मंडळे यांच्या सदस्य, विविध प्रकारच्या संस्थांचे सदस्य, सोसायटयांचे पदाधिकारी व सदस्य, ज्येष्ठ नागरिक व नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून उत्साहाने सहभागी व्हावे व स्वच्छ नवी मुंबई शहराप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले.
नवी मुंबई इको नाइट्स हा आपला नवी मुंबईचा संघ इंडियन स्वच्छता लीगमध्ये मागील वर्षीपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त करीत लीग अंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात दिली.