स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामध्ये सागरदिप सोसायटी ते एव्हरग्रीन सोसायटीच्या अंर्तगत भागातील रस्त्यावर नो पार्किगचे फलक लावावे व जोपर्यत येथील वाहतुक कोंडीची समस्या सुटत नाही तोपर्यत एव्हरग्रीन व वरूणा या दोन गृहनिर्माण सोसायटीच्या कचरा संकलनासाठी छोटी वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरातील प्रभाग ८६ चे कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये वाहतुक कोंडीची तसेच कचरा न उचलण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. सिडकोच्या बी टाईप सोसायटीपासून ए टाईपच्या एव्हरग्रीनपर्यत महापालिकेचा अंर्तगत रस्ता आहे. या अंर्तगत रस्त्यावर दोन्ही बाजूल वाहने उभी केलेली असतात. यामुळे त्या ठिकाणाहून वाहनांना ये-जा करण्यास अडचणी होतात. सकाळी महापालिकेची कचरा संकलनासाठी महापालिकेची गाडी येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने असल्याने कचरा संकलनाच्या वाहनाला एव्हरग्रीन तसेच वरूणा सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यतही जाता येत नाही. त्यामुळे या सोसायट्याच्या प्रवेशद्वारापाशीच कचरा हा कचराकुंडीत साठलेला दिसून येतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना तसेच स्थानिक रहीवाशांना या कचराकुंडीतील कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागत असल्याचे जीवन गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सागरदीप सोसायटी ते एव्हरग्रीनसोसायटीपर्यतच्या अंर्तगत रस्त्यावरील परिसर नो पॉर्किग केल्यास रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत आणि महापालिकेला वरूणा व एव्हरग्रीन सोसायटीतील कचरा संकलन करण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. लवकरात लवकर या ठिकाणी रस्ता नो पार्किग जाहीर करून त्या ठिकाणी फलक लावावेत आणि या समस्येचे निवारण होईपर्यत वरूणा आणि एव्हरग्रीन या दोन सोसायट्यांमधील कचरा संकलनासाठी तात्पुरत्या स्वरूपात कचरा संकलन करणाऱ्या जीपची व्यवस्था करून वरूणा व एव्हरग्रीन सोसायटीतील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.