एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ खान यांचा दावा
नवी मुंबई : इतकी दिवस भिजत घोंगडे पडलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाच्या हालचालींना अचानक गती आली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आम्ही उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे तसेच प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा दिल्यावरच मेट्रोच्या लोकार्पण हालचालींना सुरूवात झाली असल्याचा दावा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि नवी मुंबई-रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी केला आहे.
नवी मुंबई मेट्रोचे दिवाळीपूर्वी १४ नोव्हेंबरपयंत उद्घाटन व लोकार्पण न झाल्यास पाडव्याला एमआयएमच्या वतीने प्रतिकात्मक उद्घाटन करण्याचा इशारा एमआयएमच्या हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनातून दिला होता. या निवेदनात त्यांनी नवी मुंबई मेट्रोचे बेलापुर ते पेंधर तळोजादरम्यानचे काम चार-सहा महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालेले आहे. दीड महिन्यापूर्वीच रेल्वेने मेट्रोचे काम पूर्ण झाल्याचे सिडकोला लेखी स्वरूपात कळविले आहे. आजमितीस तळोजा, पेंधर, खारघर, बेलापुर दरम्यान मेट्रो सुरू न झाल्याने तसेच एनएमएमटीच्या बसेस संख्येने कमी असल्याने रहीवाशांना प्रवासासाठी दररोज खासगी प्रवासी वाहनांना २५० ते ३०० रुपये एकावेळेस मोजावे लागत आहेत. यामुळे मेट्रो सुरु नसल्याने लोकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत असून वेळेचाही अपव्यय होत आहे. वेळ व पैसा जात असल्याने तसेच पुरेशी प्रवासी सुविधा नसल्याने लोक निवासी वास्तव्यासाठी पुन्हा नवी मुंबई, ठाणे, पनवेलला पसंती देवू लागले आहेत. हे चित्र शोभनीय नसल्याचे म्हटले होते.
काम पूर्ण झाले आहे, रेल्वेने काम पूर्ण झाल्याचे सिडकोला लेखी कळविले असतानाही लोर्कापणास विलंब होत असल्याचे सांगत हाजी शाहनवाझ खान यांनी नाराजी व्यक्त करत दिवाळी पाडव्याला एमआयएम प्रतिकात्मक उद्घाटन करणार असल्याचा इशाराही नुकताच दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दिवाळी दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे लोर्कापण करण्याच्या सिडकोने हालचाली सुरू केल्याने एमआयएममुळे सिडको उद्घाटनासाठी धावपळ करत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे.