गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून त्यादृष्टीने ऑगस्ट महिन्यापासून ३ फेऱ्यांमध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने इतर सर्वच मोहीमांप्रमाणे हा कार्यक्रमही यशस्वीरित्या राबविण्याकडे लक्ष केंद्रीत केले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.
लसीकरण हे बालकांमधील मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असून अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांच्या तुलनेत लवकर आजरी पडतात किंवा मृत्यू पावतात असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आलेले आहे. त्या अनुषंगाने ऑक्टोबर महिन्यापासून राबविली जाणारी तिसरी फेरी अत्यंत महत्वाची आहे. या मोहीमेचे महत्व लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन केले आहे. विशेष मिशन इन्द्रधनुष ५.०ची तिसरी फेरी ९ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
याबाबत लसीकरण टास्क फोर्स समितीच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इंडियन मेडीकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रीक, एकात्मिक बालविकास विभाग यांचे प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटना, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांचे प्रमुख तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अपेक्षित लाभार्थ्यांच्या यादीतील प्रत्येक लाभार्थ्यावर लक्ष केंद्रीत करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीकरिता प्रत्येक वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण क्षमतेने काम करावे निर्देश वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत जवादे यांनी दिले . विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० च्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडाही तयार करण्यात आलेला आहे. अंगणवाडी सेविका यांची सभा घेण्यात आली असून लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या बालकांची यादी तयार करण्यात आलेली आहे.
वयोगटानुसार ० ते २ वर्ष वयाचे १३६१ लाभार्थी, एम.आर प्रथम डोस करिता ३१७ व एम.आर द्वितीय डोस करिता २८६ लाभार्थी तसेच ३०० गरोदर माता हे अपेक्षित लाभार्थी आहेत. याकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रार्थनास्थळे, अंगणवाडी, शाळा, खाजगी दवाखाने, समाजमंदिरे, सोसायटी कार्यालये अशा लसीकरणांच्या ठिकाणांची निश्चिती करण्यात आलेली असून लाभार्थ्यांना त्यांच्या रहिवास ठिकाणापासून जवळ लसीकरण करता यावे याची काळजी घेण्यात आलेली आहे.
हे करताना सुटलेले व वंचित राहिलेली लाभार्थी क्षेत्रे, गोवर आजाराच्या दृष्टीने अतिजोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसींचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, स्थलांतरित लोकवस्तीचा भाग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, उद्रेकग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारी व प्रतिसाद न देणारी क्षेत्रे याकडे विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यासाठी एकूण २९० ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
बालकांसाठी विहित वेळेत केले जाणारे लसीकरण अत्यंत महत्वाचे असून मुलांना जन्मत: बीसीजी, हिपेटायटिस बी; दीड, अडीच व साडेतीन महिन्याच्या बाळांना ओपीव्ही रोटा व पेन्टा, दीड; साडेतीन व नऊ महिन्याला आयपीव्ही व पीसीव्ही; नऊ महिन्याला व दीड वर्षाला एमआर व अ जीवनसत्त्व; दीड वर्षाला ओपीव्ही व डीपीटी; पाच वर्षाला डीपीटी; दहा व सोळाव्या वर्षाला टीडी; दर सहा महिन्याला अ-जीवनसत्त्व – अशा प्रकारे लस दिल्यास पोलिओ, घटसर्प, कावीळ, क्षयरोग, डांग्या खोकला, न्युमोनिया, श्वसनदाह, धनुर्वात, मेंदूज्वर, गोवर, रुबेला, रातआंधळेपणा अशा आजारांपासून संरक्षण मिळते.’पाच वर्षात सात वेळा ‘ हा लसीकरणाचा बीजमंत्र असून पाच वर्षापर्यंत बाळाने ७ वेळा म्हणजेच जन्मतः , दीड महिने, अडीच महिने , साडे तीन महिने, नऊ महिने, दीड वर्षे आणि पाच वर्षे लसीकरणाला भेट देणे अपेक्षित आहे , यामुळे बाळाला ११ आजारांपासून संरक्षण मिळणार आहे.
तसेच गरोदर महिलांनाही लसीकरणाचे फायदे असून धनुर्वात व घटसर्प याची लस दिली जाते. गरोदर मातेने नोंदणी केल्यानंतर तिसऱ्या व चौथ्या महिन्यात आणि पहिले बाळ तीन वर्षांपेक्षा लहान असेल तर केवळ बूस्टर डोस दिला जातो.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना व बालकांना लसीकरणाचा लाभ मिळावा व लसीकरणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
लसीकरणाचा संपूर्ण रेकॉर्ड यू-विन पोर्टलमुळे ऑनलाईन असणार असून यू-विन पोर्टलवरून गरोदर माता आणि बाळाची लसीकरणाची नोंद आता ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे यू-विन पोर्टल अंतर्गत लाभार्थ्याच्या लसींची त्याच वेळी नोंद केली जाईल. गरोदर माता आणि मुलाची नोंदणी केली जाईल. लस मिळाल्यानंतर मोबाईल नंबरवर यू-विन पोर्टलव्दारे संदेश येईल आणि लसीकरणाशी संबंधित सर्व तपशील हे यू-विन पोर्टलवर उपलब्ध असतील. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना घरबसल्या यू-विन पोर्टलवरून कोणत्याही लसीकरण सत्रावर लस घेण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार अपॉईंटमेट घेता येईल व त्यानुसार सत्राच्या ठिकाणी भेट देऊन बाळाला लस घेता येईल.
या मोहिमेतील उपक्रमाचा जास्तीत जास्त बालकांना लाभ मिळावा यासाठी व्यापक प्रचार – प्रसिध्दीवर भर दिला जाणार असून महापालिका क्षेत्रात माईकींगव्दारे मोहीमेची माहिती प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणे नागरी आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविकामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील घरोघरी भेट देण्यात येऊन लाभार्थ्यांना लसीकरणाकरिता बोलविण्यात येणार आहे.
आजचे बालक हे उद्याचे भविष्य असून, आपली बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग कार्यवाही करीत असून पालकांनीही आपल्या बाळाला व गर्भवती आणि प्रसूत झालेल्या मातांनीही आवश्यक लसीकरण विहित वेळेत करून घेण्याची काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.