गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वेळ नाही, संघटनात्मक कामासाठी वेळ देणे जमत नाही अशा पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून पदावरून बाजूला व्हावे आणि इतरांना संधी द्यावी असे आवाहनवजा निर्देश महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी ऐरोलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्याना दिले.
नाना पटोले यांनी ऐरोलीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकणस्तरीय आढावा बैठकीत नाना पटोले यांनी संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणूका याबाबत नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना वरील निर्देश दिले. नाना पटोले यांनी नवी मुंबईत केल्या जाणाऱ्या कॉंग्रेसच्या आंदोलनाबाबत जिल्हा कार्यकारिणीला विश्वासात घेवून आंदोलने करा, अशा कानपिचक्याही संबंधितांना दिल्या. त्यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना नानाभाऊ जेवत असताना कोणी नानाभाऊंचे कान भरले याची खमंग चर्चाही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली.
नवी मुंबई बैठकीत सुरुवातीलाच कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी जे पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमांना येत नाहीत, पक्षासाठी वेळ देत नाहीत अशा पदाधिकाऱ्यांना हटविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नाना पटोले यांच्याकडे केली. यावेळी नवी मुंबईतील दोन विधानसभा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, जेएमपीए, आंतरराष्ट्रीय विमानतळ, एमआयडीसी आदी पार्श्वभूमी विषद करताना प्रदेशच्या नेत्यांनी नवी मुंबईकडे लक्ष द्यावे, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वेळ द्यावा अशी मागणी केली. याशिवाय भाजपच्या सध्याच्या आमदार मंदा म्हात्रे यापूर्वी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. कॉंग्रेसकडे स्थानिक पातळीवर अनेक नेते व पदाधिकारी आहेत, पक्षाने त्यांना संधी दिली पाहिजे, मार्गदर्शन केले पाहिजे. असे सांगताना पक्षात काम करताना माझी कोणाबद्दल तक्रार नाही, कारण हे सर्व पत्यांतील ५२ पाने आहे. मला त्यांच्यासोबतच खेळायचे आहे, पक्ष वाढवायचा आहे, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी वरिष्ठांसमोर मांडली.
यावेळी नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसकडून अनिल कौशिक यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी पदवीधर मतदारांची नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी नाना पटोले, नसीम खान, हुसेन दलवाई यांच्यासह व्यासपिठावरील वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या.
आढावा बैठकीला नवी मुंबईच्या बैठकीत माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अविनाश लाड, महिला कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षा सौ. पुनम मिथुन पाटील, सुदर्शना कौशिक, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष सुतार, माजी नगरसेवक अमित पाटील, माजी नगरसेविका मिरा पाटील, अरविंद नाईक, नवी मुंबई कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, दिनेश गवळी, जीवन गव्हाणे यांच्यासह कॉंग्रेसचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षीय पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर शिबिरात महत्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्याची अंमलबजावणी करणे, मंडल कमिट्या, बुथ प्रमुखांची सद्य परिस्थिती, ग्राम समित्या, ब्लॉक कार्यकारिणीची माहिती, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदे, आगामी सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीत नावे नोंदवणे वा वगळणे, जिल्हा व ब्लॉक काँग्रेसच्या ठराव बुकांच्या तपासणीबाबत सविस्तर चर्चा केली जात आहे. आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व विभागातही अशाच पद्धतीने आढावा बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यात काँग्रेस पक्षाला स्वारस्य नाही. राज्यातील लोक वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने शासकीय रुग्णालयात दररोज मरत आहेत. शेतकरी संकटात सापडला असून राज्यात काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती असताना सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. बेरोजगारी व महागाई प्रचंड वाढली आहे, भाजपा राज्यात जनतेला जगणे मुश्कील झाले आहे, महाराष्ट्र अधोगतीला लागला असताना मुख्यमंत्री कोण होणार, मंत्री कोण होणार याची चर्चा केली जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक स्तरावर, मंडल स्तरावर व ग्राम स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी किती झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, कोकण विभागाचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’च्या Needly App चे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.