गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या सोडवून जुईनगरवासियांना दिलासा देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेवून निवेदनातून केली आहे.
जुईनगरवासियांना गेल्या काही महिन्यापासून पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासनाकडून कधी दूषित पाण्याचा पुरवठा तर कधी कमी दाबाने होत असलेल्या पाण्याचा पुरवठा या समस्येने जुईनगरवासिय त्रस्त झाले आहेत. आम्ही याबाबत लेखी निवेदन दिल्यावर तात्पुरत्या स्वरूपात समस्येचे निवारण होते. पुन्हा लगेच समस्या जैसे थे असते. गेल्या काही दिवसांपासून जुईनगर सेक्टर २३ मधील रहीवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मोरबे धरंण भरल्याने समाधान व्यक्त होत असतानाच आमच्या जुईनगरवासियांना मात्र पाण्याची त्रास सहन करावा लागत आहे, हा विरोधाभास पालिका प्रशासनाने संपुष्ठात आणावा, असे विद्याताई भांडेकर यांनी आयुक्त नार्वेकर यांना चर्चेदरम्यान सांगितले.
गेल्या काही दिवसापासून जुईनगर सेक्टर २३ मधील साई सागर सोसायटी, सूचित दर्शन सोसायटी, बापू दर्शन सोसायटी, अमन सोसायटी, सुखसगर सोसायटी, लेण्याद्री सोसायटी यासह अशा बऱ्याच गृहनिर्माण सोसायट्यांना ८ दिवसापासून पाणी अपुरा वेळ येत आहे. आले तरी अर्धा तासाच्या वर पाणी येत नाही. पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महिलांना पाण्यासाठी आजूबाजूच्या सोसायटीतील परिचितांकडे जावे लागत आहे. स्वमालकीचे व तुडुंब भरलेल्या मोरबे सारखे धरण असतानाही पाण्यासाठी जुईनगरवासियांचे होत असलेले हाल, त्यांना सहन करावा लागणारा त्रास हे गांभीर्य या निवेदनातून आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. आपण लवकरात लवकर जुईनगर सेक्टर २३ मधील कमी दाबाने होत असलेल्या पाण्याच्या समस्येचे निवारण करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.