महारोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना मिळाली स्वप्नातील नोकरी
१९१७ उमेदवार नोंदणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmailcom
नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सक्षम प्रोजेक्ट व अक्षय फाऊंडेशनच्या सहकार्याने गुरूवारी (दि.२६ ) आयोजित मोफत महारोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील रोजगाराची प्राप्ती झाली. तर काहींच्या मुलाखती होवून त्यांची नोंदणी निवड प्रकीयेच्या पुढील टप्प्यासाठी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी १९१७ उमेदवारांनी नोंदणी करून भरघोस प्रतिसाद दिला. सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल हॉलमध्ये लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी महारोजगार मेळाव्याचे आयोजक तसेच नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गणेशजी नाईक टस्टचे पदाधिकारी, सक्षम प्रोजेक्टचे दयाळ केंगन, अक्षय फाऊंडेशनचे अक्षय ढमाल, सहभागी कंपन्यांचे प्रतिनिधी व रोजगार इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, महारोजगार मेळाव्यामधून युवकांना रोजगार मिळवून देत त्यांच्या मनात विश्वासाची पेरणी निर्माण करण्यात आली आहे. यासाठी लोकनेते नाईक यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. येत्या काळात नवी मुंबईत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर उद्योगात केंद्र सरकार पाच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यंवित होण्याची शक्यता आहे. या दोन्ही उद्योगात नोकरी प्राप्त करण्यासाठी तरुणांनी आवश्यक कौशल्य स्वतःमध्ये निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केली. जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी महारोजगार मेळावा उपक्रमाचा आढावा घेताना आतापर्यंत आठ महारोजगार मेळावे पार पडल्याचे सांगितले. महिलांसाठी विशेष मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यामधून स्थानिक तसेच राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. औद्योगिकरण होत असताना स्थानिक बेरोजगार युवकांना कंपन्यांमधून रोजगार मिळालाच पाहिजे अशी ठोस भूमिका जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी यावेळी मांडली. या वर्षीच्या महारोजगार मेळाव्यात ५०० विविध क्षेत्रातील कंपन्यांनी नोंदणी केली असून ८० कंपन्यांनी त्यांचे स्टॉल मेळावास्थळी लावले होते. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक आजही कार्यरत आहेत. हि बाब आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. डॉ.संजीव नाईक यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले. महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार देण्याचे काम होत असल्याबद्दल डॉक्टर नाईक यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात युवकांसाठी मोठ्या संख्येने नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे भरविण्यात येत आहेत. देशभरातील कारागिरांना प्रशिक्षण देणारी अभिनव विश्वकर्मा योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे, अशी माहिती देत बेरोजगार युवकांनी यश मिळेपर्यंत प्रयत्न सुरु ठेवावे, असा सल्ला दिला. महारोजगार मेळाव्यात बीपीओ, केपीओ, आयटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट, फिनान्स, इन्शुरन्स, सिक्युरिटी, उत्पादन, टयुटोरियल्स, इंजिनिअरिंग, फूड, रिटेल, कम्प्युटर हार्डवेअर ऍन्ड नेटवर्कींग, हॉस्पिटल्स, सेल्स ऍन्ड मार्केटींग, हॉटेल इंडस्ट्री इत्यादी क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.
मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना सुप्रसिध्द मार्गदर्शक सुहास पाटील यांनी करियर विषयक मार्गदर्शन केले. मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखत कशी द्यावी, याविषयी टिप्स दिल्या. मेळाव्यात ज्यांना नोकर्या मिळाल्या त्यांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप
करण्यात आले.
प्रतिक्रिया…
मी दिघा येथे राहतो. प्रथमच मी महारोजगार मेळाव्यात आलो आणि मला नोकरी मिळाली. संदीप नाईक याना मी विनंती करतो कि त्यांनी अशाप्रकारचे मेळावे नवी मुंबईत सर्वत्र आयोजित करावेत.
– कार्तिक डोंगा, दिव्यांग उमेदवार
प्रतिक्रिया…
मी नोकरीसाठी फ्रेशर्स होते. मला नोकरी मिळाली आहे. महारोजगार मेळाव्यातून बेरोजगारांना आधार देण्याचे काम होते आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार.
-विधी राक्षे, उमेदवार