नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील पाण्याची समस्या तात्काळ सोडविण्यासाठी पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळेतही पाणी देण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी कॉंग्रेस पक्षाचे प्रभाग ८६चे वार्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्याकडे एका निवेदनातून केली आहे.
स्वमालकीचे धरण असतानाही आम्हा नेरूळवासियांना पाणी माफक प्रमाणावर उपलब्ध होत नसून गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी नेरूळवासियांना टाहो फोडावा लागत आहे. पाण्याची समस्या आज नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावात गंभीर रूप धारण करू लागली आहे. सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात सकाळी ४ ते ५ तास आणि रात्री दीड ते दोन तास पाणी यायचे. परंतु गेल्या एक महिन्यापासून सारसोळे गाव, साडे बारा टक्के भुखंडावरील इमारती, गावठाण भागातील ग्रामस्थांच्या इमारती, चाळी, सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रात्री दीड ते दोन तास येणारे पाणी बंद झाले असून ते येतच नसल्याच्या तक्रारी रहीवाशांकडून तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मोरबे धरण असताना व ते तुडूंब भरलेले असताना नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना व सारसोळेच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचा का सामना करावा लागत आहे? धरण मालकीचे आणि पाण्यासाठी रडत बसायचे अशी वेळ सारसोळेच्या ग्रामस्थांवर आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांवर आली आहे. पाण्याच्या मोबदल्यात देयके घेत असताना महापालिका प्रशासन माफक प्रमाणात सारसोळेच्या ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना पाणी का उपलब्ध करून देत नाही? समस्या गंभीर आहे. नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांना आणि सारसोळेच्या ग्रामस्थांना पूर्वीप्रमाणे रात्रीच्या वेळी दीड ते दोन तास पाणी पुन्हा सुरू करावे. कमी दाबाने येणाऱ्या पाण्याच्या समस्येचे निवारण करावे यासाठी आपण संबंधितांना निर्देश देवून सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहाच्या रहीवाशांच्या पाणी समस्येचे निवारण करण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त व शहर अभियंत्यांकडे केली आहे.