गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या तीन महिन्यांत तीन फेऱ्यांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ ही मोहीम नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आली. या कालावधीत ६५०६ बालके व १९३८ गरोदर माता अशाप्रकारे ८४४४ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अर्धवट लसीकरण झालेली तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात असे आढळून आलेले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराच्या दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, ऑगस्ट महिन्यापासून तीन फेऱ्यांमध्ये ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.०’ मोहीम कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या नियंत्रणाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२३ या तीन महिन्यात एकूण तीन फेऱ्या नमुंमपा कार्यक्षेत्रात यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या आहेत.
या मोहिमेमध्ये पहिल्या फेरीत ७ ते १२ ऑगस्ट २०२३ दरम्यान २२९१ बालकांचे तसेच ६७३ गरोदर मातांचे, दुसऱ्या फेरीत ११ ते १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान २०८३ बालकांचे तसेच ६१५ गरोदर मातांचे आणि तिसऱ्या फेरीत ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ कालावधीत २१३२ बालकांचे तसेच ६५० गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आले. अशा प्रकारे ३ फेऱ्यांमध्ये एकूण ६५०६ बालकांचे तसेच १९३८ गरोदर मातांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता लसीकरण टास्क फोर्स समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ पिडियाट्रीक, एकात्मिक बालविकास विभाग यांचे प्रतिनिधी, सर्व रुग्णालयांचे प्रमुख तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण करून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
प्रत्येक फेरी दरम्यान किंवा फेरीनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या पर्यवेक्षक यांच्यामार्फत लसीकरण सत्राच्या ठिकाणी भेटी देऊन फेर तपासणी करण्यात आली तसेच कार्यक्षेत्रातील पाच वर्षापर्यंतच्या बालकांची फेर तपासणी करून लसीकरणाची स्थिती पडताळण्यात आली. यामध्ये एकही बालक वंचित आढळलेले नाही.
मोहिमेतील उपक्रमाचा जास्तीत जास्त बालकांना व गरोदर मातांना लाभ मिळावा यासाठी अभियानांतर्गत उपलब्ध सुविधांची माहिती नागरिकांना मिळण्याकरिता वस्तीवस्तीत मायकिंग तसेच बॅनर व होर्डिंगव्दारे जनजागृती करण्यात आली. आशा स्वयसेविकांमार्फत घरोघरी भेटी देऊन लाभार्थ्यांना लसीकरणाकरिता पाचारण करण्यात आले.
‘पाच वर्षात सात वेळा’ हा लसीकरणाचा बीजमंत्र असून पाच वर्षापर्यंत बाळाचे ७ वेळा म्हणजेच जन्मतः, दीड महिने, अडीच महिने, साडेतीन महिने, नऊ महिने, दीड वर्षे आणि पाच वर्षे लसीकरण होणे अपेक्षित आहे. यामुळे बाळाला ११ आजारांपासून संरक्षण मिळत असते. नियमित लसीकरणांतर्गत बाळाला द्यावयाच्या सर्व लसी महानगरपालिकेमार्फत मोफत देण्यात येत असून याकरिता पालकांनी महानगरपालिकेचे नजिकचे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालय यांच्याशी संपर्क साधून बाळाला वेळीच लस देऊन सुरक्षित करावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.