वसंत गोपाळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ९६ मधील सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील पाण्याची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हा चिटणिस गणेश भगत यांनी लेखी निवेदनातून तसेच प्रत्यक्ष भेटून महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिका नोडमध्ये प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. हा पूर्णत: सिडको वसाहतीचा परिसर असून या ठिकाणी अल्प, अत्यल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी राहतात. गेल्या काही महिन्यापासून पाणीटंचाईच्या समस्येचा आमच्या परिसराला विळखा बसला आहे. मोरबे धरण आता पाण्याने तुडूंब भरलेले असतानाही आमच्या प्रभागातील जनतेला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पूर्वी सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा पाणी यायचे. आता केवळ सकाळीच पाणी येत असून तेही पाणी कमी दाबाने येत आहे. पाणी कमी दाबाने येत असल्याने वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही. त्यामुळे काही ठिकाणी रहीवाशांना खालच्या मजल्यावरून पाणी न्यावे लागत आहे. कमी दाबाने पाणी येत असल्याने पाण्याच्या टाक्याही भरत नाही. तुडूंब भरलेल्या मोरबे धरणाचे मालक असलेल्या नवी मुंबईमधील नेरूळवासिय तहानेने व्याकुळ झाले आहेत. पुरेशा प्रमाणात आमच्या प्रभागातील रहीवाशांना पाण्याचा पुरवठाही उपलब्ध होत नाही. दररोज सकाळी सोसायट्यांचे वाचमन ओरडत असतात की, पाणी कम आया है, चला जाएगा, पाणी भरके रखो. हे नेहमीचेच चित्र झाले आहे. घरामध्ये लहानमोठी भांडी पाण्याचे भरून ठेवण्याची आज वेळ आलेली आहे. काही ठिकाणी तर स्वयंपाकासाठी ५० ते ७० रुपये खर्च करून रहीवाशांना बिसलेरीचे बाटले आणावे लागत आहेत. नेरूळमधील आमच्या प्रभागात दुष्काळग्रस्त भागासारखे चित्र निर्माण झालेले आहे. समस्या गंभीर आहे. सततच्या पाणीटंचाईने विभागातील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरात पूर्वीप्रमाणे दोन वेळा पाणी सोडण्यात यावे आणि पाणीपुरवठा कमी दाबाने न होता चांगल्या प्रमाणात उपलब्ध व्हावा. पाणीटंचाईची समस्या संपुष्ठात आणून आपण स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हा चिटणिस गणेश भगत यांनी संयुक्तपणे महापालिका प्रशासनाकडे केली आहे.