नवी मुंबई : प्रदूषणाच्या समस्येवर मार्ग काढताना वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत नवी मुंबईतील सुरू असलेल्या बांधकामांवर बंदी घालणेबाबत तसेच नवीन बांधकामांना परवानगी न देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
राज्यामध्ये प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करू लागली आहे. नवी मुंबई शहरही त्यास अपवाद नाही. नवी मुंबई शहरालाही प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. यापूर्वीच नवी मुंबईमध्ये श्वसनाच्या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे नवी मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नवजात शिशूपासून ते वयोवृद्धांपर्यत प्रत्येकावर गंभीर आजारांची टांगती तलवार कायम आहे. या प्रदूषणाच्या समस्येमुळे मृत्यूची आकडेवारी वाढण्यापूर्वीच प्रशासनाने गंभीरपणे पाऊले उचलणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत जनजागृतीही करणे आवश्यक असल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कार्यवाहीस प्रारंभ केला आहे, ही खरोखरीच स्तुत्य व अभिनंदनीय बाब आहे. परंतु कोणत्याही समस्येवर रामबाण उपाययोजना हवी की ज्यायोगे समस्येचे निवारण झाले पाहिजे. वरवरची मलमपट्टी नको. महापालिका प्रशासनाने प्रदूषणाच्या समस्येवर नियत्रंण आणण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने आपल्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये महानगरपालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छ केले जात असून या वाहनातील स्प्रेयर प्रणालीद्वारे हवेतील धूलीकणांची सफाई केली जात असल्याने नामदेव भगत यांनी महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
नवी मुंबई शहर दिघा ते बेलापुरदरम्यान विखुरलेले आहे. इतक्या मोठ्या शहराला व जवळपास २० लाखाच्या आसपास जावून लोकसंख्या पोहोचलेल्या नवी मुंबईकरांची प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले उपाय तोकडेच आहेत, हे मी सर्वप्रथम प्रामाणिकपणे नमूद करत आहे. ही दोन धूळनियत्रंक वाहने या शहरात दिवसभरात किती वेळा फिरणार व त्यामुळे कितपत प्रदूषणाला व धुळीला आळा बसणार याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ही वाहने मुख्य रस्त्यावर फिरत आहेत. अंर्तगत परिसराचे काय, तेथील रस्त्यावर व रस्त्यालगतच्या परिसरात धुळीची मुख्य समस्या आहे. नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहे. तसेच पुर्नबांधणीचे जोरदार वारे वाहत असल्याने येत्या काळात रिडेव्हल्पमेंटच्या कामांचा भस्मासूर या शहरामध्ये निर्माण होणार आहे. बांधकामांमुळे धुळीला खतपाणी मिळते हे जगजाहीर आहे. या बांधकामांमुळे वाहनांची ये-जा, बांधकाम ठिकाणी उडत असलेले धुळीचे फवारे, जुन्या इमारती पाडण्यापासून, नवीन इमारतींचा पाया, बांधकाम यामुळे शहरात अल्पावधीतच धुळीच्या समस्येचा पर्यायाने प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. धुळीच्या समस्येतून निर्माण होणाऱ्या विविध आजारांमुळे नवी मुंबईकर आज मृत्यूच्या दारात येवून पोहोचलेला आहे. नवी मुंबईकर आपले करदाते आहे. महापालिकेचे उत्पन्नच या करदात्यावर अवलंबून आहे. या करदात्याची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जोपर्यत या शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत नाही, प्रदुषणाच्या समस्येवर नियत्रंण होत नाही तोपर्यत काही कालावधीकरता नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या बांधकामांना बंदी आणावी आणि नवीन बांधकामांना ठराविक कालावधीसाठी परवानगी देवू नये. ही अंमलबजावणी केल्यास आपणास अवघ्या काही दिवसातच शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाल्याचे पहावयास मिळेल. बाहेरील भागातील रस्त्यांवर पाण्याने स्वच्छता राबवून तसेच स्प्रेयर प्रणालीद्वारे हवेतील धूलीकणांची सफाई करून वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होणार नाही. कारण या समस्येवर तोडगा नाही तर वरवरची मलमपट्टी आहे. आपल्या जखमेवर केवळ खपली नकोय तर जखम पूर्णपणे बरी करण्यासाठी उपाययोजना हवी. महापालिका प्रशासनाची ती जबाबदारी आहे. आपण धुळीच्या समस्येचे गांभीर्य पाहता नवी मुंबईकरांच्या आरोग्य हितासाठी शहरात सुरू असलेल्या बांधकामांना बंदी आणावी आणि नवीन बांधकामांना ठराविक कालावधीसाठी परवानगी देवू नये आणि तशा प्रकारचे निर्देश तातडीने जारी करण्याची मागणी नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.