स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील श्रीगणेश रामलीला मैदानावर सुरू असलेल्या आगरी-कोळी महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून गेल्या १० दिवसांपासून ५ लाखांहून अधिक लोकांनी या महोत्सवाला भेट दिलेली आहे. रविवार, दि. २१ जानेवारी रोजी या आगरी-कोळी महोत्सवाचा अखेरचा दिवस असून या दिवशीही नागरिकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबईतील ज्येष्ठ माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली गेली १७ वर्षे या आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ठाण्याचे उबाठा गटाचे शिवसेना खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत या आगरी-कोळी महोत्सवाला भेट दिली.
या महोत्सवाला भेट देण्यासाठी प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताना आपणास महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या गर्दीचा व महोत्सवाला लाभणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज येतो. दुतर्फा लागलेले वेगवेगळे स्टॉल्स यामध्ये खेळणी, खाण्याचे, मिठाईचे , लोणची-मसाले, आईसस्क्रीम, पेढे यासह अन्य स्टॉल्सचा समावेश होत आहे. या स्टॉल्सला भेटी देत असताना डाव्या हाताला लगेच लहान मुले आपल्या पालकांना घेवून जातात. या ठिकाणी झोपाळे, उंच उंच आकाधचुंबी पाळणे यावर मुलांची झुंबड उडालेली असते. स्टॉल्सला भेटी देताना समोर काही अंतरावर पुढे आल्यावर आपण आगरी-कोळी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई एकवीरा मातेचे मंदीर पहावयास मिळते. महोत्सवामध्ये सहभागी झालेला प्रत्येक जण एकवीरा मातेसमोर नतमस्तक होवून बाजूला असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचे, विघ्नहर्त्या गणरायाचे दर्शन घेतो. सभोवताली असणाऱ्या मच्छिमार महिला-पुरुषांच्या प्रतिमा, समोर असलेली बैलगाडी आगरी-कोळी लोकांच्या ग्रामीण संस्कृतीचा परिचय करुन देतात.
मैदानाच्या मध्यभागी मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दररोज केलेले दिसून येते. शनिवारी मिमिक्रीचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये अशेाक सराफ, नाना पाटेकर, सयाजी शिंदे, पंतप्रधान मोदीं यांच्यासह अनेकांचे आवाज काढून कलाकार आपल्या कलांचे प्रदर्शन करताना पहावयास मिळाले.
मैदानाच्या एका कोपऱ्यास मासे,मटन व अन्य मासांहारी पदार्थांचे स्टॉल्स व समोरच टेबल मांडलेले असतात. नेरूळ नोडमधील अनेक खवय्ये सहकुटूंब या स्टॉल्सवर भरपेट मेजवानी झोडताना पहावयास मिळाले. एका बाजूल चायनीजचे स्टॉल्स, पाणीपुरीचे स्टॉल्स व अन्य शाकाहारी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पहावयास मिळाले. सर्वत्रच खवय्यांची झुंबड उडाली होती. बच्चेकंपनी खेळण्याच्या दुकानांकडे वळाली होती. या महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या ११ दिवसांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली असून पाच लाखांहून अधिक लोक या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते.
शिवसेना उबाठा गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी महोत्सवाला भेट देण्यासाठी आले असता, थेट व्यासपिठावर न जाता महोत्सवाचे आयोजन नामदेव भगत यांच्यासमवेत सर्व महोत्सवाची पाहणी केली. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या, चर्चा केली व त्यानंतर व्यासपिठाकडे गेले. गेल्या अनेक वर्षांपासून नामदेव भगत व त्यांचे सहकारी परिश्रमपूर्वक या महोत्सवाचे यशस्वीपणे आयोजन करत आहेत. महोत्सवाला दरवर्षी लोकांची प्रतिसाद वाढत चालला असून नवी मुंबईत इतक्या संख्येने नागरिकांचा सहभाग असणारा हा एकमेव उत्सव आहे. रविवारी, २१ जानेवारी रोजी महोत्सवाचा अखेरचा दिवस आहे. या उत्सवात सहभागी होणाऱ्यांशी नामदेव भगत स्वत: सुसंवाद साधून उत्सव आयोजनामागील पार्श्वभूमी त्यांना सांगताना महोत्सवाविषयी त्यांचीही मते जाणून घेताना दररोज पहावयास मिळत आहेत.