देशाचा कानाकोपराच नव्हे तर जगभरातील अनेक देशामधील लोक २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहत आहे. सर्व विश्वच जणू काही राममय झाले आहे. कानांवर नुसता राम, श्रीराम, जय जय राम, प्रभुवर सिया रामचंद्र की जय असा सुरांचा नादब्रम्ह गुंजत आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोर्कापण सोहळा होत आहे. रामलल्लांच्या बालमूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळाही होत आहे. अयोध्येचा राम आणि राममंदिर हा आज प्रत्येक भारतीयांचा श्वास बनला आहे. जिकडे तिकडे भगवे झेंडे, झेंड्यावर प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा आहे. घराघरावर, दुकानादुकानांवर, कार्यालयांवर, इमारतींवर, वाहनांवर रामचंद्राची प्रतिमा असलेले भगवे झेंडे दिमाखात फडकताना पहावयास मिळत आहे. अयोध्येतच नाही तर जणू सर्व देशात रामराज्य अवतरले असून भगवे झेंडेमय वातावरणामुळे आपला देश आज अघोषितच हिंदू राष्ट्र झाल्याचे जवळून पहावयास मिळत आहे, याचि देही, याची डोळा हे दृश्य आपणास अनुभवयास मिळत आहे. राम मंदिर हे प्रत्येक भारतीयांचे गेल्या काही वर्षातील, दशकातील नव्हे तर पाच शतकांहून अधिक काळ बनलेले स्वप्न होते. ध्यास होता. भारत वर्षांमध्ये कोण बाबर नामक यवनी आक्रमक येतो काय, त्याचा सेनापती मीर बाकी हा आपला सम्राट बाबराच्या आदेशावरून राम मंदिर उद्धवस्त करून त्या ठिकाणी मशिदीचे बांधकाम करतो काय ? त्या मशिदीला बाबरी मशिद म्हणून संबोधले जात होते. पाच दशकाहून आपल्या रामजन्मभूमीच्या जागी, राम मंदिराच्या जागी दिमाखात उभी राहीलेली मशिद पाच शतकाहून अधिक काळ दिमाखात उभी होती. बहूसंख्य हिंदू असलेल्या भारत वर्षात प्रभू रामचंद्रांना बाबराच्या मशिदीच्या आक्रमणातून मुक्त होण्यासाठी तब्बल पाच शतकांचा कालावधी जावा लागला, हे या भूमीचे, येथील हिंदू धर्मियांचे दुर्दैवंच म्हणावे लागेल. रामजन्मभूमीच्या मुक्तिसाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला आहे. अनेक रामभक्तांना जीव गमवावा लागला आहे. १९ जानेवारी १८८५ पासून ते ३० सप्टेंबर २०१० पर्यंत न्यायालयीन संघर्ष करावा लागलेला आहे. २९ जानेवारी १८८५ रोजी निर्मोही आखाड्याचे महंत रघबर दास यांनी दिवाणी न्यायालयात या प्रकरणातला पहिला खटला दाखल केला. इथला चौथरा हा रामाचे जन्मस्थळ आहे असे म्हणत इथे मंदिर उभारण्याची परवानगी त्यांनी मागितली होती.
हा खटला टप्प्याटप्प्यात तीन न्यायालयांमध्ये फिरला. या तीनही न्यायालयांच्या निकालपत्रांमध्ये वादग्रस्त जागेशी संबंधित हिंदूंच्या श्रद्धा आणि धारणांचा उल्लेख होता. अनेक न्यायांलयांमध्ये हा खटला फिरला, न्यायमूर्ती बदलले, खटला चालविणारे वकीलही बदलले आणि अखेरीस ३० सप्टेंबर २०१० रोजी सामंजस्य पद्धतीने न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादावर कायमस्वरुपी तोडगा काढला. भारतीयांचे श्रद्धास्थान आणि आराध्यदैवत असणाऱ्या प्रभु रामचंद्रांच्या नशिबी असलेला वनवास हा त्यांच्या अलौकीक कार्याच्या समाप्तीनंतरही भुतलावर कायम राहीला आहे. हा वनवास आता २२ जानेवारी रोजी कायमचाच समाप्त होत असून रामलल्ला त्यांच्या अयोध्येतील निवासस्थानी विराजमान होत आहे आणि राम मंदिराचे लोर्कापणही याच दिवशी होत आहे. जे स्वप्न मनी वसले होते, श्वासामध्ये सामावले होते.
ते स्वप्न उद्या पूर्ण होणार आहे. लौकीकार्थांने प्रभु रामचंद्राचा वनवास संपणार आहे. दैव अवतारात प्रभू रामचंद्रानी १४ वर्षांचा वनवास भोगला होता, पण त्यांच्या अवतार समाप्तीनंतर त्यांना पाच शतकांचा वनवास भोगावा लागला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ७४ वर्षानंतर राम मंदिराचे लोर्कापण आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. आज राम मंदिराचे श्रेय भाजप घेत असल्याचा टाहो विरोधक फोडत असले तरी हे रामराज्य पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पर्यायाने भाजपामुळे अवतरत आहे, हे कोणीही नाकारणार नाही. देशाच्या लोकशाही राजवटीत कॉंग्रेस, जनता दल, पुलोद अनेकांनी सत्ता उपभोगली आहे. पण राम मंदिरासाठी जे प्रयत्न भाजपाच्या राजवटीत झाले, ते अन्य कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी केले नाही. जी तळमळ, आत्मियता राम मंदिरासाठी भाजपाच्या ठायी ठायी पहावयास मिळत आहे, तसा प्रयत्न कोणीही केला नाही. आज राममंदिराचे लोर्कापण आणि रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापणा हा देशपातळीवरचा नाही तर जागतिक पातळीवरचा विषय बनला आहे. राम मंदिराच्या लोर्कापण निमित्ताने कार सेवकांचा संघर्ष, राम भक्तांनी केलेले प्रयत्न विसरुन चालणार नाही. कारसेवकांनी केलेल्या संघर्षामुळेच बाबरी मशिदीचे पतन झाले. पाचशे वर्षांच्या अतिक्रमणातून रामजन्मभूमी मुक्त झाली. अयोध्येकडे आज जगाच्या नजरा खिळल्या आहे. अमेरिकेसह अनेक परकीय राष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी राम मंदिराचे लोर्कापण आणि रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा लाईव्ह दाखविला जाणार आहे. या कार्यक्रमाला भावनिक व धार्मिक झालर असली तरी यामुळे देशाच्या अर्थकारणाला काही काळापुरती गती मिळाली आहे. कोट्यवधींची उलाढाल काही काळापुरती वाढली आहे. धार्मिक वस्तूंच्या विक्रीने गगनभरारी घेतली आहे. लाखो नाही तर करोडो लाडूंच्या निर्मितूमुळे हॉटेल व्यवसायांना नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. भगव्या शाली, भगव्या मफलरी, भगवे झेडे, अंगठ्या, चैनी आणि या सर्वांवर राम प्रतिमा झळकताना पहावयास मिळत आहे. झेंडे निर्मितीमुळे उद्योगांना चालना मिळाली आहे. अनेक हातांना रोजगार मिळाला आहे. लघुउद्योगांना गती मिळाली आहे. प्रभु रामचंद्रावरील गाणी असलेली व्हिडिओ आणि सीडी विक्रींना गती मिळाली आहे. प्रत्येकाच्या मुखी आता अयोध्येतील कार्यक्रमाचीच चर्चा सुरु आहे. राममय वातावरण ठायी ठायी पसरले आहे. प्रत्येकाचा श्वास आणि ध्यास आता रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर लोर्कापण सोहळा पाहण्यासाठी एकवटला आहे. सर्व भारतखंड आता एकच नारा देताना पहावयास मिळत आहे, तो म्हणजे – ‘चलो अवधपुरी, अपने रामलल्ला पधार रहे है’।
– संदीप खांडगेपाटील