पुणे जिल्ह्यातील घडामोडींवर विशेषत: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि काही प्रमाणात जुन्नरलगतच्या नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये बिबट्याचा हल्ला ही बाब आता नित्याचीच झाली आहे. या परिसरामध्ये दररोज कोठे ना कोठे बिबट्याच्या उपद्रवाच्या घटना घडतच आहेत. बिबट्याचा मानवी वस्तीत प्रवेश ही गेल्या काही वर्षातील नित्याचीच घटना झाली आहे. बिबट्याने येवून शेळी, मेंढ्या, कुत्री, कोंबड्या फस्त करणे, यामुळे शेतकऱ्यांच्या पशूधनाचे नुकसान होणे आता रोजचेच झाले आहे. एकेकाळी कुत्रा घराच्या उंबरठ्यावर असला म्हटल्यावर तो घराची व पिकाची राखण करेल हा बळीराजाचा विश्वास असायचा. कुत्रा अंगणात असल्यावर चोर तर सोडा, पाहूणेमंडळीही घरात येण्यापूर्वी आवाज देवून घरातल्यांना उंबऱ्यावर बोलवत असायची. पण आता घराची, शेताची राखण करणाऱ्या कुत्र्याचीच बिबट्यापासून राखण करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे गावागावातील कुत्र्यांची संख्या कमी होत चालली आहे. कुत्र्यांच्याच संरक्षणासाठी लोखंडी पिंजरे बनवून रात्र झाल्यावर कुत्र्यांना त्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये बंदीस्त करून घ्यावे लागत आहे. शेळ्या, मेंढ्या, गायी-म्हशी, बैल यांचे गोठेही आता बंदीस्त होवू लागले आहेत. एकेकाळी गोठ्यामध्ये राहणारी ही दुधदुभत्याची जनावरे आता सिमेंटच्या भिंतीमध्ये अथवा लोखंडी कंपाऊंडच्या पिंजऱ्यामध्ये बंदीस्त होवू लागली आहेत.
ऊसामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाने बिबटे बंदीस्त करून परिसरातून घेवून गेले तरी बिबट्यांची संख्या कमी होत नाही, उलट वाढतच चालली आहे. ऊसामुळे बिबट्यांना आश्रय मिळणे सुलभ झाले आहे. बॉयलर पेटल्यावर एकीकडचा ऊस तुटून गेल्यावर बॉयलर बंद होईपर्यत पहिला तुटलेला ऊस वाढतो, त्यामुळे बिबट्यांना आश्रयासाठी धावपळ करावी लागत नाही.
शेतामध्ये फिरणे बिबट्यांमुळे एकट्यादुकट्याचे काम राहीले नाही. दुचाकीवरून जाणाऱ्यांना बिबटे महाराज सोडत नाहीत. हल्ला करतात. अंधार पडल्यावर दुचाकीस्वार दुचाकीवरून जाणे टाळतात. हल्ल्याच्या वाढत्या घटनांनी गावागावात बिबट्यांची दहशत वाढली आहे. बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. अन्य भागांच्या तुलनेत जुन्नर-आंबेगाव तालुका तर बिबट्यांचा माहेरघर बनला आहे. शहरी भागात मुले रोजगारासाठी गेल्यावर ग्रामीण भागात केवळ वयोवृद्ध मातापिताच आता घराघरात पहावयास मिळत आहेत. रात्री-अपरात्री मोबाईल वाजला तरी शहरातील मुलांच्या मनात प्रथम धडकी भरते. गावाला काही घडले तर नाही ना, अशी शंका मनामध्ये निर्माण होते. गावागावात आता सीसीटीव्ही लावण्याचे प्रमाण याचमुळे वाढीस लागल आहे. जनावरांचे गोठे, घरातील उंबरठे, घरासभोवतालचा परिसर आता सीसीटीव्हीच्या नजरेत सामावू लागला आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ एका वेगळ्याच भीतीच्या छायेखाली वावरू लागले आहेत. गावात कुत्र्यांची संख्या कमी होत चालली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतात कोणी एकटेदुकटे काम करण्यास धजावत नाही. सकाळच्या वेळी गावात दुध घेवून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवरही बिबटे हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम करायचे कधी, स्वत:ला सांभाळायचे की घरातील कुत्र्यांसह अन्य दुधदुभत्या जनावरांना सांभाळायचे, घरातील लहान मुलांना शेतात तर सोडा, घराच्या आवारातही एकट्याला खेळण्यासाठी सोडता येत नाही. बिबट्याच्या हल्यामुळे दगावल्यावर सरकार आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेते. पण हेच सरकार बिबट्यांनी हल्ला करू नये, जनावरांचे तसेच नागरिकांच्या जिविताचे काही बरवाईट होवू नये यासाठी सरकार ठोस उपाययोजना का राबवित नाही, असा संताप गावागावातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त न झाल्यास गावागावातील शेतकरी आता स्वत:ला व स्वत:च्या जनावरांना जगविण्यासाठी शिकारी झालेले पहावयास मिळतील, असे चित्र नजीकच्या काळात निर्माण होण्याची भीती आहे. सतत बिबट्याच्या दहशतीखाली किती वेळ थांबायचे असा सूर आता गावागावात आळविला जावू लागला आहे. सरकारने बिबट्याच्या समस्येवर वेळीच तोडगा न काढल्यास जुन्नर-आंबेगावचा परिसर शिकाऱ्यांचे आकर्षण बनलेला दिसून येईल. कारण जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जनजीवन भयभीत व विस्कळीत होवू लागले आहे. आपल्याला जगायचे असेल तर बिबट्याला संपवावे लागेल अन्यथा हा बिबट्या आपल्यासह आपल्या जनावरांना संपवेल, असा विचार आता गावागावात प्रबळ होवू लागला आहे. जंगलामध्ये शिकार शोधणारे शिकारी आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आहेत, शिकारीचे थ्रील हे जणू त्यांचे व्यसनच बनले आहे. त्या तुलनेत जुन्नर-आंबेगाव तालुक्यामध्ये बिबटे हे सहज पहावयास मिळतात. त्यामुळे माणसांच्या आणि बिबट्यांच्या अस्तित्वासाठी सरकारनेच आता ठोस उपाययोजना करायला पाहिजे. कारण जगण्यासाठी आणि अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष सुरु झालाय. आज मानवी जीवन बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असले तरी उद्याच्या भविष्यात मानवी जीवनामुळे बिबट्याचे अस्तित्व संपुष्ठात येवू नये म्हणजे झाले…
– जयेश रामचंद्र खांडगेपाटील
मु.पो पिंपळगाव, रता. जुन्नर, जि. पुणे