जयेश रामचंद्र खांडगेपाटील याजकडून
जुन्नर : शेती हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे परंतु लोकसंख्या वाढीमुळे तसेच प्रचंड औद्योगीकरण आणि शहरीकरण यामुळे पिकाऊ जमिनीचे क्षेत्रफळ कमी झालेले आहे, आधुनिक उपलब्ध तंत्रज्ञानामुळे शेती प्रणालींमध्ये विस्तृत पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून विज्ञान आधारित, शास्त्रीय दृष्ट्या आणि विष मुक्त शेती केली तरच भावी पिढ्या टिकतील असे प्रतिपादन पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगावचे चेअरमन राजेश खांडगेपाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे, राष्ट्रीय सेवा योजना आणि जयहिंद कॉम्प्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय कुरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास ग्राम- शहर विकास’ लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमा अंतर्गत शनिवार, २७ जानेवारी पासून पिंपळगाव तर्फे नारायणगाव या ठिकाणी होत असलेल्या शिबिरा साठी १ फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालेत पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगावचे चेअरमन राजेश खांडगेपाटील हे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख दीपक रोकडे सर होते. चुकीची राजकीय धोरण ,नैसर्गिक दृष्टचक्र, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे हा कणा मोडू पाहत आहे अशी भावना सरांनी या वेळेला व्यक्त केली. उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले छत्रपती शिवराय यांचा आपण वारसा सांगतो पण कुठेतरी मूल्यांपासून दूर गेल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दीपक रोकडे सर यांनी या वेळेला विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स भेट दिले. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मिताली वैद्य या विद्यार्थिनीने तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. ए. गाडेकर यांनी प्रास्ताविक केले.