अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात इमारत पुनर्बांधणीसाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीचे प्रभारी आणि एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे लेखी निवेदनातून ७ फेब्रुवारी रोजी केली आहे.
नवी मुंबई शहरातील इमारतींना मिळालेला वाढीव एफएसआय आणि इमारती जुन्या झाल्याने पुनर्बांधणीची गरज यामुळे शहरामध्ये टॉवरचे वारे गेल्या काही महिन्यापासून जोरदारपणे वाहत आहे. काही ठिकाणी टॉवर सुरू असून गेल्या पाच वर्षांत बांधकामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी टॉवरचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांनी करारात नमूद केल्याहून जागाही आता कमी देणार असल्याचे सांगत भाडेही कमी केले आहे. टॉवरच्या आमिषाने राहते घर सोडल्याने व गेली काही वर्षे संथ गतीने काम सुरू असल्याने रहीवाशांना तोडं दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबईकर नागरिक हे या महापालिकेचे करदाते आहेत. महापालिकेचे उत्पन्न या करदात्यांवर अवलंबून आहे. टॉवर, एफएसआय, इमारतीची जागा किती, क्षेत्रफळ किती मिळू शकते, टॉवर किती मजली इमारतीचा होवू शकतो ही सर्व माहिती एकाद्या पीएमसीच्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना देणे आवश्यक आहे. उद्या टॉवर झाल्यावर सदनिकांची संख्या वाढणार, क्षेत्रफळानुसार मालमत्ता करातही वाढ होणार. टॉवरच्या नावाखाली बिल्डरांनी रहीवाशांची फसवणूक केल्यास या शहराचीच प्रतिमा मलीन होणार आहे आणि लोक एकवेळ धोकादायक इमारतीत वास्तव्य करतील, परंतु टॉवरमध्ये जाण्याचे, बिल्डरला आपली राहती जागा सोडण्याचे धाडस दाखविणार नाहीत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी व नागरिकांना सहकार्य करण्यासाठी महापालिका प्रशासनानेच आता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका मुख्यालयात व पालिका विभाग अधिकारी कार्यालयात टॉवर, पुनर्बांधणी यावर मार्गदर्शन तसेच सहकार्य करण्यासाठी स्वतंत्र दालन सुरू केल्यास नवी मुंबईकर आपल्या समस्या मांडतील, त्यांची फसवणूक होणार नाही. त्यांना मार्गदर्शन मिळाल्याने कोणीही बिल्डर अथवा बिल्डरांना मॅनेज झालेले सोसायटीचे पदाधिकारीही रहीवाशांची फसवणूक करणार नाहीत. पालिकेकडून मार्गदर्शन मिळाल्यास लोकांनाही आपल्याला कारपेट जागा किती मिळेल, साधारण बिल्टअप जागा किती असेल, आपल्या जागेत किती मजली टॉवर उभा राहू शकेल याबाबत माहिती प्राप्त होईल. उद्या पीएमसी नेमताना अथवा बिल्डरसोबत चर्चा करताना रहीवाशी त्या माहितीच्या आधारे टॉवरविषयक करारपत्र बनवू शकतील. टॉवरप्रकरणी राजकीय घटक, बिल्डर, नेमलेले पीएमसी, सोसायटीचे ठराविक पदाधिकारी यांच्याकडून रहीवाशांची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नवी मुंबई शहरात इमारत पुनर्बांधणीसाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.
याप्रकरणी हाजी शाहनवाझ खान यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी याच विषयावर महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले होते. आयुक्तांनी ते निवेदन Assistant Director Town Planner <adtp@nmmc.gov.in>, Town Planner town _planner @nmmc.gov.in यांना फॉरवर्ड केले आहे. तथापि या १४ दिवसांमध्ये कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर पुन्हा हाजी शाहनवाझ खान यांनी ११ डिसेंबर २०२३ रोजी याच विषयावर आपणास निवेदन सादर केले होते. आपण ते निवेदन Assistant Director Town Planner <adtp@nmmc.gov.in>, Town Planner town planner @ nmmc . gov . in यांना फॉरवर्ड केले आहे. तथापि आजतागायत काहीही कार्यवाही झालेली नसल्याने पुन्हा या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
ReplyReply allForward |