जयेशभाऊ खांडगे
शेती हा आजच्या काळात एकप्रकारचा जुगारच बनला आहे. नोकरदार माणसाला महिनाभर काम केल्यावर वेतन मिळेल, याची खात्री असते. बिल्डरांना इमारतीचे काम केल्यावर सदनिका विक्रीतून मिळणाऱ्या कमाईचा अंदाज असतो. पण भुतलावर शेतकरी हा एकमेव असा वर्ग आहे की, ज्याला शेतात मरेपर्यंत काबाडकष्ट केल्यावरही शेतमालाला भाव मिळेल की नाही, याची त्याला खात्री नसतानाही तो शेतात कष्ट करत असतो. आपण आपल्याजवळील शेकडो, हजारो रुपये किंमतीच्या वस्तू घरामध्ये सुरक्षित ठेवतो, पण शेतकरी मात्र त्याचा शेतमाल शेतातच आभाळाच्या छायेखाली देवावर हवाला ठेवून निर्धास्त असतो. सध्या रमजान महिना सुरु असल्याने फळांना बाजारभाव प्राप्त झाले असून फळांच्या विक्रीचा आलेखही उंचावलेला आहे. रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र सण असून दिवसभर उपवास केल्यावर मुस्लिम बांधव सांयकाळनंतर फळावर उपवास सोडत असतात. त्यामुळे स्थानिक बाजारामध्ये विविध फळांचे विक्रीसाठी स्टॉल लागलेले पहावयास मिळतात. जसे श्रावण महिन्यामध्ये भाज्या महागलेल्या आपणास पहावयास मिळतात, त्याच धर्तीवर रमजान महिन्यामध्ये फळांचेही बाजारभाव वाढलेले पहावयास मिळतात. याच सुमारास फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याचीही विक्रीसाठी वर्दळ वाढलेली असते. हापूस आंब्याच्या किंमती या जानेवारी ते एप्रिलच्या मध्यापर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असतात. एप्रिलच्या मध्यावर राज्याच्या विविध भागातून, परराज्यातून आंब्याची आवक वाढू लागल्यावर हापूस आंबा सर्वसामान्याच्या आवाक्यात येत असतो. कोकण भागातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हापूस आंबा हे चलन मिळवून देणारे हुकमी फळ आहे. वर्षभर आंब्याच्या बागांची जोपासना केल्यावर उन्हाळ्याच्या कालावधीत त्याची विक्री करून मिळणाऱ्या पैशावर या फळ उत्पादकांच्या परिवाराचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. त्यात अनेकदा लहरी हवामानाचाही फटकाही फळ उत्पादक शेतकऱ्यांना बसत असतो. कधी वाऱ्यांमुळे, अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडल्यास वर्षभराचे काबाडकष्ट पाण्यात जातात. अवकाळीसोबत जोरदार वारा आल्यास झाडांचेही नुकसान होते. नैसर्गिक संकटाचा सामना कमी झाला की त्यात कोकण भागात अलिकडच्या काळात वानरांचाही त्रास वाढीस लागला. कोकणामध्ये वानरांकडून फळ बागांची हानी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. भाज्याचे दर वाढले, फळे महागली, कांद्याचे दर वाढले की शहरी भागातील शहरवासियांकडून महागाईबाबत ओरड चालू होते. त्या त्या भागातील सत्ताधारी मतांचे अर्थकारण सांभाळण्यासाठी फळे, भाज्या, कांदे यांच्या निर्यातीवर बंधने लादतात. त्यामुळे कधी नव्हे तो बळीराजाच्या खिशामध्ये पैसा येण्याची संधी असते, ती संधीही निर्यातीवर मर्यादा लादल्याने हिरावून घेतली जाते. कृषीमालाच्या किंमती वाढल्या म्हणजे महागाई झाली, असा शहरवासियांकडून फोडला जाणारा टाहोच आज बळीराजाच्या अधोगतीला खऱ्या अर्थांने कारणीभूत आहे. मॉलमध्ये हजारो रूपयांची कपडे घेताना व अन्य खरेदी करताना, सिनेमागृहात महागडी तिकीटे विकत घेवून सिनेमा पाहताना, याच सिनेमागृहात पाचशे-हजार रुपयांची पॉपकार्नवर उधळण करताना महागाईचा स्पर्शही याच्या खिशाला होत नाही, तसेच पैशाची उधळपट्टी होत असल्याचा विचारही यांच्या मनामध्ये येत नाही. किती हा विरोधाभास आहे? कृषीमालाच्या वाढत्या किंमतीवर टाहो फोडणाऱ्या शहरवासियांची मानसिकताचा आज बळीराजाच्या अर्थकारणाला अडथळे निर्माण करत आहे. फळांचे, भाज्यांचे, कांद्याचे दर वाढले म्हणजे शेतकऱ्याला फायदा होतो, असा विचार करणाऱ्यांनी जरा कृषी विभागातील पिक उत्पादनापासून पिकाची विक्री होईपर्यतच्या घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. शेती हा विषय समजावून घेणे आवश्यक आहे. स्थानिक बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या दराच्या तुलनेत अनेकदा अर्धे पैसेही कृषी माल पिकविणाऱ्या बळीराजाच्या खिशामध्ये जात नाही. शेतीसंदर्भात खत-औषधांच्या वाढलेल्या किंमती, वाढलेले मजुरीचे दर, बी-बियाण्याच्या वाढलेल्या किंमती, नांगरणी-फवारणीचे वाढलेले दर, शेतापासून बाजार समितीपर्यत कृषी माल विक्रीसाठी आणेपर्यत करावा लागणारा वाहतुकीचा खर्च, कृषीमालाची विक्री करून दिल्यावर बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना १० ते १२ टक्के द्यावा लागणारे कमिशन, माथाडींची मजुरी हे सर्व जावून बळीराजाच्या हातात काय पडत असेल? याचाही विचार यानिमित्ताने होणे आवश्यक आहे. त्यामुळे वाढल्या थोड्या किंमती, गेला बळीराजाच्या खिशात थोडा फार पैसा, कधी तरी उमलले त्याच्या चेहऱ्यावर हास्य तर कोणते मोठे आभाळ आपणावर कोसळणार आहे? आपण काय त्यामुळे कफल्लक बनणार आहोत? दिवसाला काही शेकडो रुपये इंधनावर खर्च करणारे, प्रवासामध्ये ओला-कुबेरवर, रिक्षा-टॅक्सीवर खर्च करणारे आपण भाज्यांच्या किंमती थोड्या फार महागल्या तर किती तांडव करतो? सोशल मीडियावर अनेक विचारवंत याबाबत मत मांडण्यात आक्रमकता दाखवित असतात. पण शेतकऱ्याला प्रत्येक पिकामध्ये फायदा होत नाही, हातात पैसे भेटत नाहीत. एका पिकामध्ये थोडे फार पैसे भेल्यावर उर्वरित पाच-सहा पिकांमध्ये त्याचे भांडवलही वसुल होत नाही. जर प्रत्येक पिकामध्ये शेतकऱ्याला उत्पन्न भेटले असते तर बळीराजाला अनाथ होण्याची व त्याच्या परिवारावर पोरके होण्याची, मुलांवर अनाथ होण्याची वेळ आली नसती, याचाही प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. इंधनाच्या किंमती वाढत असतानाही, प्रवासी भाडे वाढलेले असतानाही आपण खासगी वाहनातून प्रवास करतोच, स्वस्त असणाऱ्या सार्वजनिक वाहनाचा पर्याय स्विकारत नाही?शॉम्पू, साबणापासून अत्तरांच्या किंमती वाढत असतानाही आपण त्या खरेदी करतोच. देवपूजा करताना महागडी सुगंधी अगरबत्ती असणे अलिकडे प्रतिष्ठेची बाब बनली आहे. विक्रीला आलेल्या फ्लॉवरच्या शेतात साधी अळई शिरली तरी आख्खा फ्लॉवरचा बाग उद्धवस्त होण्यास वेळ लागत नाही आणि शेतकऱ्यांच्या हाताला काही मिळत नाही. जोरदार वारा आला तर वालवड, टॉमटो व अन्य पिकांच्या बागा भुईसपाट होतात. पुन्हा मजुर आणून बागा उभे करण्यासाठी शेतकऱ्याचे हजारो रुपये जातात. आपल्या गाडीला लागले अथवा आपण आजारी पडलो तर विम्याचे पैसे भेटतात, पण शेतीत नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना पिकामागे नुकसान भरपाई मिळत नाही आणि मिळालीच तर ती तुटपुंजी असते. त्यामुळे फळांच्या, भाज्यांच्या रमजानमध्ये, श्रावणामध्ये किंमती वाढल्या तर टाहो फोडण्याचे पातक करू नका. कारण हा बळीराजा जगला तरच शेती टिकणार आहे आणि त्यामुळे आपल्याला धान्य मिळणार आहे, हे कधीही विसरु नका.