सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी देशातील लोकसभेचा सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने देशभरात आचारसंहिता लागू झालेली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्र्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मविआ लोकसभेच्या जागा वाटप प्रक्रियेत अंतिम टप्प्यात असून कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज, हातकणंगलेतून राजू शेट्टी तसेच अकोला आणि एका मतदारसंघात वंचितला उमेदवारी मिळणार असल्याचे प्राथमिक टप्प्यातील चित्र आहे. वंचितकडून २० हून अधिक जागांची मागणी केली जात असल्याने मविआतील वंचितच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना, भाजपा निवडणूक लढविणार आहे. भाजपाकडून पहिल्या टप्प्यातील २० उमेदवारांची यादी जाहीर झाली असून उर्वरित जागेवरील उमेदवारही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सलग तीनदा सत्ता संपादन करण्यासाठी भाजपाने प्रारंभापासून आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ४५ प्लसचे मिशन असले तरी मविआच्या तगड्या आवाहनामुळे महायुतीला ३० जागाही मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेतील फुटीमुळे महाराष्ट्रातील मतदार भाजपावर कमालीचा नाराज असून मतदारांची शरद पवार व उद्धव ठाकरेंना आजही सहानुभूती असल्याचे विविध सर्व्हेमध्ये स्पष्ट झालेले आहे. केवळ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी भाजपाकडून ४५ प्लसची भाषा बोलली जात आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेसोबत १३ खासदार आले असले तरी त्या १३ खासदारांना तिकिट मिळेल की नाही याची शाश्वती नाही. एकत्रित शिवसेनेने लढविलेल्या जागाही भाजपा शिंदेच्या शिवसेनेला देणार नसल्याचे चित्र आहे. कोकणातील सिंधुदुर्गातून व ठाण्यातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपा आग्रही आहे. एकत्रित शिवसेनेने लढविलेल्या जागांबाबत शिंदे गट आग्रही असला तरी त्या जागा तर सोडाच, पण सोबत आलेल्या खासदारांचे मतदारसंघही टिकविणे शिंदेंना अवघड जात असल्याचे राजकीय चित्र पहिल्या टप्प्यात निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाला लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीत फारसे स्थान नसल्याचे आणि ४८ पैकी जेमतेम ३ ते ४ लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात पडणार असल्याची राजकारणात चर्चा सुरु आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात बहूचर्चित असलेल्या मतदारसंघापैकी एक मतदारसंघ आहे. सध्या या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार आहेत. २०१४-२०१९ या दोन्ही लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून राजन विचारे निवडून आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्याने व ठाण्यात शिवसेनेचे प्राबल्य असल्याने ठाणे मतदारसंघ न सोडण्यासाठी शिंदे समर्थक आक्रमक झाले आहे, तर प्रकाश पराजंपेसाठी शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपाने शिवसेनेकडून हिरावून घेतला, तोच निकष लावत भाजपा पुन्हा या मतदारसंघावर दावा करु लागली आहे. गणेश नाईक ऐरोलीतून, सौ. मंदा म्हात्रे बेलापुरातून, संजय केळकर ठाण्यातून भाजपाचे आमदार आहेत. नवी मुंबईच्या विसर्जित महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे होते. ठाण्यासह भाईंदरमध्ये भाजपाची ताकद वाढीस लागली आहे. तसेच २०१४, २०१९ मुळे मोदी लाटेमुळे ठाण्यातून शिवसेनेचा खासदार विक्रमी मतांनी विजयी झाल्याचा दावा भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उघडपणे करत आहेत.
शिवसेनेच्या शिंदे गटाकडून रविंद्र फाटक यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी ही जागा भाजपा लढविण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. भाजपाकडून गणेश नाईक, सौ. मंदा म्हात्रे, डॉ. संजीव नाईक, संजय केळकर, विनय सहस्त्रबुद्धे या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. डॉ. संजीव नाईक या मतदारसंघातून २००९-२०१४ मध्ये या मतदारसंघाचे खासदार होते. विनय सहस्त्रबुद्धे हे आरआरएस संबंधित नाव असले तरी हे नाव जनसामान्यांमध्ये फारसे परिचित नाव नसल्याने राजन विचारेंचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सहस्त्रबुद्धे याचे नाव मागे पडत चालले आहे. डॉ. संजीव नाईक व संजय केळकर ही नावे प्रारंभापासून चर्चेत असताना गेल्या काही दिवसांपासून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक व बेलापुरचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांचीही नावे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शिंदे गटाचा उमेदवार नसल्यास ठाण्यातील शिवसैनिकांची मते राजन विचारेंकडे जाणार तसेच शिवसैनिक विचारेंचेच काम करणार असल्याचे ठाण्यात बोलले जात आहे. भाजपाने नवी मुंबईतून उमेदवारी न देता अन्य बाहेरील उमेदवार लादल्यास नवी मुंबईकरांमध्ये राजन विचारे नाव गेली १० वर्षे संपर्कात व चर्चेतील नाव असल्याने भाजपाला नवी मुंबईतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. लोकसभेचे बिगुल वाजल्याने तीन-चार दिवसात ठाण्याची जागा कोण लढविणार आणि उमेदवार कोण असणार हे स्पष्ट होणार आहे.