ज्येष्ठ पत्रकार जयेश खांडगेपाटील यांचे थेट शिवजन्मभूमीतून संपादकीय
देशाच्या कानाकोपऱ्यात सध्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचीच चर्चा सुरु आहे. आपल्या देशात क्रिकेट आणि राजकारण हे दोन विषय असे आहेत की, आपण भारतीय या दोन विषयांवर कित्येक तास चर्चा करु शकतो. वाद घालू शकतो. दुसऱ्याची मते खोडू शकतो. अगदी वेळ पडल्यास आपली मते त्यावर लादण्यासाठी आक्रमकही होऊ शकतो. भारत देश लोकसभा निवडणूक या एकमेव विषयाने व्यापून गेला आहे. निवडणूकीत काय होणार, कोणाचे सरकार येणार, कोण निवडून येणार, कोण पराभूत होणार याचे आखाडे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक तावातावाने मांडताना पहावयास मिळत आहेत. या चर्चांमध्ये केवळ महाराष्ट्र राज्यातील राजकारणांविषयीच नाही तर देशातील अन्य भागातील राजकीय घडामोडींचाही या चर्चेत समावेश होत आहे. आपल्या राज्यामधील कित्येक लोकसभा मतदारसंघामध्येही अनेक जण फिरकलेले नसतात, तर बाहेरील राज्यामध्ये जाणे शक्यच नसते. त्या भागामध्ये कधी जाणे-येणे नाही, त्या भागामध्ये काही वैशिष्ठ्य आहेत, शेतात काय उत्पादन होते, तेथील भाषा कोणती आहे, तेथील चालीरिती काय आहेत, प्रथा-परंपरा काय आहेत, याविषयी फारशी माहिती नसतानाही तेथील राजकीय घडामोडींविषयी, राजकारणांविषयी, उमेदवारांविषयी, तेथील नेतेमंडळींविषयी इंत्यभूत माहिती असल्याचे चर्चेदरम्यान छातीठोकपणे सांगण्यात येत आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातील किमान ९५ टक्के नागरिक हे राजकीय विषयाला वाहून घेतल्याचे अनेक सर्व्हेमध्ये स्पष्ट झालेले आहे. अपवादात्मकरित्या केवळ ५ टक्के लोक राजकारणाविषयी निरुत्साह दाखवित असतात. देशामध्ये लोकसभा निवडणुका सुरु असल्याने निवडणुकबाबतच्या चर्चांनी देशाचा कानाकोपरा व्यापल्याचे पहावयास मिळत आहे. शेतात पाणी भरणारा शेतकरी असो, एसटी स्टॅण्डवरील गर्दीत वावरणारा प्रवासी असो, रेल्वेच्या डब्यामध्ये गर्दीमध्ये घामाजलेला प्रवासी असो, इतकेच नाही तर गावागावामध्ये सुरु असलेल्या विवाह सोहळ्यांमध्ये व्यासपिठावर उपस्थित असणारी माणसे असो. प्रत्येकाच्याच मुखी निवडणुकीत काय होणार, कोण निवडुन येणार, कोण पडणार याचीच चर्चा सुरु आहे. राजकीय व्यसन हे दारु-सिगारेट-जुगार या व्यसनाहूनही भयावह असल्याचे लोकसभा निवडणुकादरम्यान पहावयास मिळत आहे. दारु पिणारा दारु पिऊन शांत बसेल, सिगारेट ओढणाऱ्याची सिगारेट संपल्यावर तलफ भागेल, चरस-गांजा ओढणारे आपल्या नशेत तल्लीन होतील, पण राजकारणाची नशा ही या सर्व नशांहून विचित्र आहे. माणूस उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यत संपर्कात येईल त्या प्रत्येकासोबत राजकीय चर्चा करताना पहावयास मिळत आहेत. टीव्ही चॅनल्सवर आपली विद्वता पाजळणारे विद्वान देखील सर्वसामान्यांच्या राजकीय चर्चा पाहिल्यावर सर्वसामान्यांपुढे फिके असल्याचे आभासी वातावरण सध्या निर्माण झाले आहे. मतदारांशी चर्चा करून सर्व्हे निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांचे सर्व्हे कसे बनतात? याविषयी नाविन्य आता राहीलेले नाही. सर्व्हे करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी त्या त्या विभागात सर्व्हे करताना चहाच्या टपऱ्या, सलूनवाले, भाजी विक्रेते, पान टपऱ्या यावर उभे राहून अंदाज घेत असतात. मतदारयादीतील नावे चाळून एका जागेवर बसून स्वत:च हजारो फॉर्म सर्व्हे कंपन्याचे कर्मचारी भरत असल्याचे अनेकदा उघडकीस आलेले आहे. निवडणुकीमध्ये वारे कसेही, कोणत्या दिशेने वाहत असले तरी मतदानाच्या अगोदर शेवटच्या दोन-तीन दिवसांमध्ये प्रचाराला कलाटणी मिळत असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये स्पष्ट झालेले आहे. शेवटच्या दोन-चार दिवसातील घडामोडींमुळे प्रचाराला केवळ कलाटणीच मिळत नाही तर ३५ ते ४० टक्के मतदारांची मानसिकताही यामुळे बदली होत असते व हीच उलथापालथ निकालावरही परिणाम करून जाते. सर्व्हे करणारे कधीही घरोघरी जात नाही. दारोदारी जावून मतदारांशी चर्चाही करत नाही. कारण अनेक जण आपापल्या कामात व्यस्त असतात. अर्ज भरुन देईपर्यत अथवा चर्चा करुन देईपर्यत त्यांना वेळही नसतो. याशिवाय आपले मत व्यक्त करून उगाच कशाला कोणाशी राजकीय वितुष्ठ ओढावून घ्यायचे असा सरळ मध्यमवर्गीय विचार त्यांना अर्ज भरून देण्याचे धाडस करायला अडथळे आणत असतो. केशकर्तनालयामध्ये केस कापताना, दाढी करताना माणसे सलूनवाल्यांशी बिनधास्तपणे चर्चा करत असतात. निवडणूकीत कोणता उमेदवार कसा आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे, तो स्वच्छ वर्तणुकीचा आहे अथवा बदमाश आहे यावर कोणतीही भीती न बाळगता, कोणताही आडपडदा न ठेवता, बिनधास्तपणे सलुनवाल्यांशी मनमोकळेपणे संवाद होत असतो. त्यामुळे सर्व ग्राहकांशी बोलता बोलता सलुनवाला तसेच सलूनमध्ये केस कापणारी मुलेदेखील राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होत जातात. भाजी विक्रेत्यांशी भाजी घेताना पुरूष तर पुरुष, पण महिलाही राजकीय चर्चा करताना पहावयास मिळतात. पानटपरी तसेच चायनीज हॉटेल अगदी बिअरबारही सध्या तेथे सुरु असणाऱ्या चर्चांमुळे राजकीय प्रवाहाला समरस झालेला पहावयास मिळतो. घरातील अडचणी, गरजा याविषयी फारशी माहिती नसणारी माणसे राजकीय उमेदवाराची इंत्यभूत माहिती ठेवत असतात. उमेदवाराच्या घरातील सदस्यांना उमेदवाराविषयी जितकी माहिती नसते, तितकी माहिती मतदारांना ठाऊक असते. अर्थात यातील सर्वच माहिती सत्य असते अशातला भाग नाही. अनेकदा विरोधक जनसामान्यांची दिशाभूल करण्यासाठी, उमेदवाराची प्रतिमा मलिन करण्यासाठी गोबेल्स तत्वाचा आधार घेत चुकीची माहिती पसरवत असतात. सत्य दरवाजात चपला घालून बाहेर पडेपर्यत असत्य सारे गाव फिरुन आलेले असते, असे म्हणतात, ते काही खोटे नाही. निवडणुक काळात आपल्याकडून अथवा आपल्या कार्यकर्त्यांकडून, समर्थकांकडून, हितचिंतकांकडून कोणतीही चुक होऊ नये अथवा आगळीक घडू नये यासाठी उमेदवार यासाठीच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. प्रचारयंत्रणा राबविणाऱ्यांना तशा सूचनाही दिलेल्या असतात. निवडणूक काळातच आपल्या देशात लोकशाही नांदत असल्याचे दिसून येते. लोक याच काळात राजकीय चर्चा तावातावाने करताना पहावयास मिळतात, अन्यथा इतर वेळी ते राजकीय उदासिनताच बाळगत असतात. निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्यातील मतदान आज होत आहे. भाजपा व कॉंग्रेस कंबर कसून निवडणूकीत परिश्रम करत आहे. ही निवडणूक सत्ता राखण्यासाठी भाजपाला प्रतिष्ठेची तर कॉंग्रेसला राजकीय अस्तित्वासाठी प्रतिष्ठेची आहे.