सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : शहरातील सर्व प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय रहावा व पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याचे तत्परतेने निराकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वी सर्व प्राधिकरणांच्या संयुक्त बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला.
यामध्ये त्यांनी महापालिका क्षेत्रातील सुरु असलेल्या कामांची सद्यस्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. सुरु असलेली कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरु होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत रहावे असे आयुक्तांनी सूचित केले.
बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे आयुक्तांनी निर्देश दिले. गटारांची सफाई करताना काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले. काही ठिकाणी बंद गटारांवरील झाकणे तुटली असल्यास ती तत्परतेने बदलावीत तसेच झाकणांच्या अधिकच्या चाव्या बनवून घ्याव्यात असेही सूचित करण्यात आले.
मोठे नाले सफाईची कामे सुरु झाली असून त्या कामांना वेग द्यावा आणि ती लवकरात लवकर विहित वेळेत पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष दयावे असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. या नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात कोणताही अडथळा राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे सूचित करतानाच काही ठिकाणी नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात झोपड्या असल्यास त्या हटविण्याची कार्यवाही करावी, असेही निेर्देश देण्यात आले. आठही विभागांचे सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी यांनी या बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले.
विभागवार सुरु असलेल्या पावसाळापूर्व कामांची सदयस्थिती काम निहाय लेखी स्वरुपात घेण्यात यावी तसेच १५ मे आणि ३० मे लाही त्या त्या वेळची स्थिती लेखी स्वरुपात आठही कार्यकारी अभियंत्यांकडून संकलित करावी व एकत्रित स्वरुपात सादर करावी असे निर्देश आयुक्तांनी शहर अभियंता यांना दिले.
मोठया उधाण भरतीची वेळीच अतिवृष्टी झाल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणी पाणी उपसा पंपांची व जनरेटरची पुरेशा संख्येने व्यवस्था करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी झोपडया असल्यास त्या स्थलांतरित कराव्यात असेही सूचित करण्यात आले. या कालावधीत पिण्याचे पाणी शुध्द राहील याची विशेष दक्षता घेण्यात यावी तसेच पाणीपुरवठा व मलनि:स्सारण व्यवस्था सुस्थितीत कार्यान्वित राहील याचीही काळजी घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले.
सोसायटयांच्या कुंपण भिंती पडून दूर्घटना होऊ नये याची पूर्वदक्षता घेऊन तशा प्रकारच्या धोकादायक कुंपण भिंती आढळल्यास त्या दुरुस्त करुन घेण्याच्या सूचना विभाग कार्यालयामार्फत सोसायटींना द्याव्यात, असेही सूचित करण्यात आले.
सायन-पनवेल हायवेवरील सबवे तसेच रेल्वे स्टेशन नजिकचे सबवे यांची स्वच्छता करुन घ्यावी व त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था व सीसीटीव्ही व्यवस्था राहील याकडे लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. पावसाळा कालावधीत रस्त्यावरील दिवाबत्ती तसेच सिग्नल यंत्रणा सुस्थितीत राहील याची काळजी घेण्याच्या विद्युत विभागास सूचना देण्यात आल्या.
शहरात बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी अपघात प्रतिबंधक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी घोषित करावी असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अतिधोकादायक इमारतींच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यात आलेले आहेत याची खात्री करुन घ्यावी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यादृष्टीने सदर इमारती रिक्त करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
पावसाळी कालावधीत साथीचे रोग उद्भवू नयेत यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात यावा अशा सूचना देण्यासोबतच नमुंमपा रुग्णालयांमध्ये साथरोग वॉर्ड कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
उद्यान विभागामार्फत होणाऱ्या वृक्षछाटणीमध्ये धोकादायक व अडथळा आणणाऱ्याच फांदयांची छाटणी केली जावी तसेच छाटणीनंतर होणारा हरित कचरा उचलून नेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाशी समन्वय राखून विनाविलंब कार्यवाही करावी असेही सूचित करण्यात आले. अग्निशमन दलाने उपलब्ध यंत्रसामग्रीची तपासणी करून घ्यावी तसेच मदतकार्याची सज्जता करून ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या.
पावसाळी कालावधीत मदतकार्य करण्यासाठी तत्पर असणारे विभाग कार्यालये व अग्निशमन केंद्र येथील आपत्कालीन नियंत्रण कक्ष २४x ७ कार्यरत राहतील याचे नियोजन करावे व त्याठिकाणी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री उपलब्ध करुन ठेवावी असे निर्देश देण्यात आले. तसेच आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्ती काळात अडचणीच्या प्रसंगी नागरिकांनी स्थलांतरित करावे लागल्यास तात्पुरत्या निवाऱ्याच्या जागा निश्चित करुन ठेवून तेथे अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करुन ठेवावे अशाही सूचना देण्यात आल्या.
पावसाळापूर्व नालेसफाई व गटारे सफाई या कामांना गती दयावी तसेच सुविधा कामांसाठी झालेले खोदकाम १५ मे पर्यंत पूर्ववत करुन घ्यावे असे सूचित करतानाच नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांनी आपापली जबाबदारी सुयोग्य रितीने पार पाडावी व सुसज्ज राहावे असे निर्देश दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी विविध विभागांनी करावयाच्या कामांचा बाबनिहाय आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिरिष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त चंद्रकांत तायडे व इतर विभागप्रमुख तसेच आठही विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.