नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांची सेवा कायम करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.
नवी मुंबई महापालिका स्थापनेपासून प्रशासनात नागरी सुविधा देण्याचे आणि नागरी समस्यांचे निवारण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच केले जात आहे. नवी मुंबई शहराचा कारभार सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरीत केला. कारभार हस्तांतरीत करताना कंत्राटी कर्मचारी हस्तांतरीत झाले. महापालिका प्रशासनाला ३२ वर्षे झाली, तरी कंत्राटी कामगारांची सेवा कायम झालेली नाही. अनेक आंदोलने झाली, निदर्शने झाली, पण या कर्मचाऱ्यांची सेवा कायम झालेली नाही. कामगार नेते खुप झाले, कामगार संघटनाही खुप झाल्या. सर्वांनी कामगारांसाठी प्रयत्न केले. पण कर्मचाऱ्यांची सेवा कायम झाली नाही. आजही प्रशासन मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करत नाही. पालिका प्रशासनाचे काम कंत्राटी कामगार करत आहेत. वेतन महापालिका प्रशासन देत आहे. मग पालिका वर्षानुवर्षे ठेकेदारांचे चोचले का पुरवत आहेत? ठेकेदार अनेक ठिकाणी कामगारांना काम न करताही पगार देत आहे. पालिकेचे काही कंत्राटी कर्मचारी काम न करता राजकारण्यांच्या कार्यालयात काम करून पालिकेचे वर्षानुवर्षे वेतन घेत आहेत. अनेक ठिकाणी ठेकेदार पालिकेच्या कंत्राटी कामगारांना स्वत:च्या खासगी काम करवून घेतात, पगार मात्र पालिकेकडून देतात. अनेक कंत्राटी कामगार सुट्टीवर गेल्यावर सुट्टीचा पगार काही ठेकेदार काढून घेतो. असा सावळागोंधळ गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. पालिकेने ठेकेदार न पोसता थेट कर्मचारी ते पालिका असा संपर्क ठेवावा. ठेकेदारी पद्धत बंद करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्यासाठी आपण नवी मुंबई महापालिका प्रशासनाला निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.