संदीप खांडगेपाटील यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडकोच्या वरुणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी असणाऱ्या छोटेखानी मैदानात असणाऱ्या झाडांच्या फांद्याचा असलेला कचऱ्याचा ढिगारा हटविण्याची लेखी मागणी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सिडकोच्या वरुणा व हिमालय या गृहनिर्माण सोसायटीच्या मध्यभागी एक छोटेखानी मैदान आहे. या मैदानात छाटलेल्या तसेच तोडलेल्या वृक्षांच्या फांद्याचा ढिगारा रचण्यात आला आहे. हा ढिगारा प्रशासनाकडून बरेच दिवस हटविण्यात आलेला नाही. सध्या पाऊस सुरु आहे. सारसोळे गावातील ग्रामस्थांना व नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना वरूणा सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत एक पायवाट आहे. लोक येथून-ये-जा करत असतात. या पायवाटेच्याच बाजूला कचऱ्याचा ढिगारा रचण्यात आला आहे. या ढिगाऱ्यामुळे परिसराला बकालपणा आला असून तेथील स्थानिक रहीवाशांना डासांचा उद्रेकही सहन करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना हे फांद्या असलेल्या कचऱ्याचे ढिगारे तातडीने हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.