नवी मुंबई : सध्या पडत असलेला पाऊस पाहता मोरबे धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने लागू केलेली पाणीकपात रद्द करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मोरबे धरणात कमी झालेला पाणीसाठा पाहता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना होत असलेल्या पाणीपुरवठ्यात कपात केलेली आहे. आठवड्यातून तीन दिवस सांयकाळच्यावेळी पाणी येत नसल्याने नवी मुंबईकरांचे हाल होत आहेत. सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे. मोरबे धरणक्षेत्रात पाऊस पडत आहे. पाण्याची पातळीदेखील वाढू लागलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लागू केलेली पाणीकपात मागे घ्यावी, तसेच आठवड्यातून तीन दिवस सांयकाळच्या वेळी बंद केलेले पाणी पुन्हा पूर्ववत करण्यात यावे. त्यामुळे सध्या पडत असलेला पाऊस व नवी मुंबईकरांना करावा लागत असलेला पाणीटंचाईचा सामना पाहता समस्येचे गांभीर्य ओळखून आपण पाणीकपात रद्द करुन नवी मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.