नवी मुंबई (प्रतिनिधी) : मोहरमनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष व्यवस्था ठेवण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीचे प्रभारी व एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
येत्या १७ जुलै रोजी मुस्लिम धर्मियांचा ‘मोहरम’ येत आहे. मोहरम हा मुस्लिम धर्मियांसाठी श्रद्धेचा व भावनेचा विषय आहे. मोहरमच्या दिवशी मुस्लिम समाजाचे लोक ताजिया काढतात. हे हजरत इमाम हुसेन यांच्या कबरीचे प्रतीक मानले जाते आणि लोक शोक करतात. लोक छाती ठोकून इमाम हुसैन यांच्या हौतात्म्याचे स्मरण करतात. कथाकथन, रडणे आणि छाती ठोकणे, काळे परिधान करणे, अर्धवट उपवास करणे, रस्त्यावरील मिरवणुका आणि करबलाच्या लढाईची पुनरावृत्ती या मुस्लिम धर्मियांच्या परंपरांचा भाग आहेत व वर्षानुवर्षे मुस्लिम धर्मियांकडून या परंपरांचे पालन केले जात आहे. सध्या देशात वाढलेला जातीय, धार्मिक द्वेष पाहता आपण मोहरमनिमित्त नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष बंदोबस्त ठेवण्याचे राज्याच्या गृह विभागाला विशेषत: पोलिसांना निर्देश द्यावेत. मोहरमनिमित्त मुस्लिम धर्मिय रस्त्यावर मिरवणूका काढत असल्याने काही समाजविघातक शक्ती त्यात शिरकाव करुन जातीय, धार्मिक कलह वाढविण्याची भीती आहे. त्यामुळे आपण नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकापातळीवर स्थानिक पोलीस ठाण्यांना मुस्लिम बांधवांसमवेत बैठका घेवून त्यांचे नियोजन जाणून घ्यावे व पोलीस बंदोबस्ताविषयी माहिती द्यावी. मोहरम हा मुस्लिम धर्मियांसाठी शोक व्यक्त करण्याचा दिवस असून मुस्लिम समाज या दिवशी शोकाकूल असतो. त्यामुळे अडीच महिन्यांनी राज्यात येऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही समाजविघातक शक्ती मोहरमच्या सणामध्ये विघ्न निर्माण करण्याची भीती आहे. मुस्लिम समाजाने नेहमीच कायदा व सुव्यवस्थेचा तसेच भारतीय संस्कृतीचा आदर केलेला आहे. तथापि काही धर्मांध व जातीय शक्ती जाती व धार्मिक कलह पसरवून आपल्या देशात मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन करत आहेत. समस्येचे गांभीर्य पाहता नवी मुंबई, पनवेल, उरणसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या त्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मोहरमनिमित्त तातडीने मुस्लिम समाजाच्या, सामाजिक संस्थांच्या बैठका आयोजित करुन विचारविनिमय करावा, विशेष पोलीस बंदोबस्त ठेवून कोठेही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.