नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होत आहे. सीबीडी बेलापुर सेक्टर १५ मधील बेलापुर न्यायालयासमोरील प्लॉट नंबर ४२/४३, मयुरेश प्लॅनेट, शॉप नंबर ५ येथे भाजपा कार्यालय सुरु होत आहे.
नवी मुंबई जिल्हा भाजपाच्या अध्यक्षपदी संदीप नाईक या युवा नेतृत्वाची निवड झाल्यानंतर संघटनात्मक बांधणी करण्याबरोबरच ऐरोली व बेलापुर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रत्यक्ष जनसंपर्कावर अधिक भर दिला आहे. भाजपा कार्यालय आजवर केवळ वाशीतच असल्याने आता बेलापुरमध्येही जिल्हा भाजपा कार्यालयाचे होत असलेले उद्घाटन ही भाजपा कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे.
भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची सामाजिक व राजकीय क्षेत्रातील श्रीगणेशापासून ते आजतागायतची वाटचाल ही कागदावरील माहितीवर विसंबून राहणारी नसून थेट सुसंवाद व जनसंपर्कावरच राहीलेली असल्याने भाजपा संघटनेला त्याचा फायदाच होत असल्याचा सूर गेल्या काही महिन्यापासून भाजपा पदाधिकारी व तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये आळविला जावू लागला आहे. नवी मुंबईमध्ये राजकीय नेतेमंडळी शेकडोनी कार्यरत असल्याचे बॅनरबाजीवरुन दिसत असले तरी दिघा ते बेलापुरदरम्यान सर्वांधिक पायपीट केलेले व जनतेशी थेट सुसंवाद करणारे संदीप नाईक हे नवी मुंबईतील एकमेव नेतृत्व ठरले आहे. नवी मुंबईचे शिल्पकार व लोकनेते गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून संपर्कात आलेल्याची जातधर्म व राजकीय पक्ष न पाहता प्रत्येकाचीच कामे केली आहेत. त्याचाच वारसा आज संदीप नाईक पुढे चालविताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांशी, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी संदीप नाईकांचे अगदी घरटी जिव्हाळ्याचे संबंध राहीलेले आहे. २००५ ते २०१० या कालावधीत महापालिकेच्या तिसऱ्या सभागृहात नगरसेवक म्हणून कार्यरत असताना स्थायी समितीचे सभापती म्हणून संदीप नाईकांनी सभापतींच्या वातानुकूलित कार्यालयात बसून नवी मुंबईचा कारभार न हाकता ‘सभापती आपल्या अंगणात’ हे अभियान राबवून थेट नवी मुंबईकरांशी संपर्क साधला. पावसाळीपूर्व कामे पालिका प्रशासन कशाप्रकारे करते याचा कागदी अहवाल न पाहता नवी मुंबईतील प्रभागाप्रभागात भेटी दिल्या. नालेसफाईसह रस्ते व अन्य कामाची माहिती जाणून घेतली. ३ ऑगस्ट २००७ साली नवी मुंबईत मुसळधार पाऊस होत असल्याने वाशीत रस्त्यावर पाणी आले होते. वाशीतील विश्वज्योती हॉटेलच्या समोरील बाजूस व शालांत परिक्षा बोर्डच्या कार्यालयालगत असलेला नाला तुंबला होता. त्यावेळी तुंबलेला नाला सफाईसाठी महापालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता संदीप नाईक अंगावरच्या कपड्यानिशी थेट नाल्यात उतरले. गळ्याएवढ्या पाण्यात जावून तुंबलेला कचरा स्वत: काढण्यास सुरुवात केली. यावेळी हातात त्यांनी ग्लोव्हज घातले नाही अथवा इतरांसारखे फोटोसेशन करण्यासाठी त्यांनी फोटोग्राफर सोबत नेले नव्हते. सानपाडा पामबीच भागातील मनसेचे कार्यकर्ते त्यावेळी तेथील समस्या घेवून संदीप नाईकांच्या भेटीसाठी आले होते. आजही ते या घटनेचे साक्षीदार आहेत.
२००९ व २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ऐरोली मतदारसंघातून संदीप नाईक निवडून आले. २०१४ मध्ये देशभरात मोदी लाट असताना व सर्वत्र राजकीय विरोधी वातावरण असताना ऐरोली मतदारसंघाचा गड संदीप नाईकांना राखता आला तो केवळ त्यांचा तळागाळातील जनतेशी असलेल्या थेट जनसंपर्कामुळेच. भाजपा नवी मुंबईची धुरा आज जिल्हाध्यक्ष या नात्याने संदीप नाईकांच्या हाती आहे. ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूका येऊ घातल्या आहेत. संदीप नाईक हे स्वत: बेलापुर विधानसभा मतदारसंघाचे रहीवाशी आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत विधानभवनात शंभर टक्के हजेरी असणारे ठाणे जिल्ह्यातील ते एकमेव आमदार होते. अंगात प्रचंड ताप असताना व अशक्तपणा आलेला असतानाही नवी मुंबईच्या समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सभागृहात हजेरी लावणारे संदीप नाईक हे आजही विरोधी पक्षातील आमदारांसाठी आजही आदरपूर्वक चर्चेचा विषय ठरत आहेत.
गेल्या काही महिन्यापासून बेलापुर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईकांच्या विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा सुरु झालेली आहे. संदीप नाईकांनी याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरी भाजपाचे पदाधिकारी आता सोशल मीडियावरून त्याची चर्चा करु लागले आहेत. फेसबुकवर तसे व्हायरलही होवू लागले आहेत. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कोणाचा उघड रोष नको म्हणून खुलेपणाने बोलत नसले तरी पडद्याआड दबक्या आवाजात आता संदीप नाईकांच्या उमेदवारीचा आग्रह धरु लागले आहेत.
बेलापुरात भाजपा जिल्हा कार्यालय सुरु होत असल्याने नेरूळ, सिवूडस, बेलापुर, जुईनगर येथील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी सुखावले आहेत. महापालिकेत कामे घेवून गेल्यावर लगतच असलेल्या भाजपा कार्यालयात जावून संघटनात्मक कामे करणे सोपे जाणार असल्याचे भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी बोलू लागले आहेत.