नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना अजून तीन-सव्वा तीन महिन्याचा कालावधी बाकी असला तरी ठाणे जिल्ह्यातील बेलापुर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नवी मुंबईत पडत असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असला तरी बेलापुरमधील राजकीय वातावरण मात्र कमालीचे ‘हाय व्होल्टेज’ बनू लागले आहे. १९९० पासून बेलापुर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिल्यास दर दहा वर्षानंतर या मतदारसंघाने जुन्या आमदाराला घरी बसवून नव्या आमदाराकडे बेलापुरचा कारभार सोपविला आहे. सध्या भाजपाच्या अधिकाधिक पदाधिकाऱ्यांकडून व सर्वांधिक माजी नगरसेवकांकडून, कार्यकर्त्यांकडून ‘बेलापुरकी जनता करे पुकार, इस बार संदीप नाईक बनेगे बेलापुर के आमदार’
असा सूर आळविला जाऊ लागल्याने आगामी तीन-सव्वा तीन महिन्यात पावसाळा असतानाही राजकीय कलगीतुऱ्यात बेलापुरच्या राजकारणातील गरमागरमी पहावयास मिळणार असल्याचे संकेत प्राप्त होऊ लागले आहेत.
१९९० आणि १९९५ सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बेलापुरमधून नवी मुंबईचे शिल्पकार व लोकनेते गणेश नाईक आमदार म्हणून निवडून आले होते. १९९९ साली झालेल्या विधानभा निवडणुकीत कांदा बटाटा मार्केटमध्ये झालेल्या मतमोजणीदरम्यान गणेश नाईक प्रचंड आघाडीवर असताना व कोणत्याही क्षणी विजयाची घोषणा होणार असतानाच ‘बाहूबली’ घडामोडी पडद्याआड घडल्या व गणेश नाईकांना पाडले गेले. पुन्हा २००४ आणि २००९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेलापुर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक निवडून आले. २०१४ साली मोदी लाटेत मंदा म्हात्रे यांनी अवघ्या १२०० मतांनी गणेश नाईकांचा निसटता पराभव केला. २०१४, २०१९ साली मंदाताई म्हात्रे या मतदारसंघाच्या आमदार राहील्या आहेत. २०२४ची विधानसभा निवडणुक आता अवघ्या तीन-सव्वा तीन महिन्यावर आलेली आहे. दर दहा वर्षानंतर आमदारकीचा चेहरा येथील मतदार बदलत असल्याने भाजपाच्याच कार्यकर्ते, पदाधिकारी व माजी नगरसेवकांकडून संदीप नाईक हा सक्षम पर्याय उभा करण्यात येऊ लागला आहे.
११ जुलै २०२४ रोजी बेलापुर येथे भाजपाचे जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. निमित्त भाजपाच्या जिल्हास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे असले तरी अनेक माजी नगरसेवकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांचे व्हॉटस अप स्टेटसवर मात्र बेलापुरचे आमदार संदीप नाईक असे बॅनर आताच झळकू लागले आहेत.
संदीप नाईक यांनी यापूर्वी दोन वेळा विधानसभेत ऐरोली विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले असून गेल्या काही वर्षांपासून ते बेलापुर विधानसभा मतदारसंघात निवासी वास्तव्य करत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात संदीप नाईकांचा दांडगा जनसंपर्क आहे. बेलापुरमधून पक्षाने युवा रक्ताला अर्थात संदीप नाईकांना तिकिट देण्याची मागणी भाजपाच्या सर्वाधिक माजी नगरसेवकांकडून , पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईत बेलापुर हा उच्चशिक्षित मतदारांचा भरणा असलेला व अधिकाधिक शैक्षणिक सुविधांचे जाळे असणारा मतदारसंघ आहे. संदीप नाईक हे स्वत: उच्चविद्याविभूषित असून प्रगल्भ विचारसरणीचे आहेत. शिवराळ भाषेपासून संदीप नाईक हे कोसो मैल लांब असून लहानथोरांपासून ते संपर्कात आलेल्या प्रत्येकालाच ते आदरपूर्वक वागणूक देत असतात.
राज्यात तिकिट वाटपाबाबत अजून शांतता असतानाच बेलापुर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथींना गती आली आहे. भाजपाचे अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी उघडपणे संदीप नाईकांच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका मांडू लागले आहेत. सोशल मीडियावर तशा स्वरुपाच्या बॅनरबाजीला उधानही आले आहे. त्यामुळेच बेलापुरकी जनता करे पुकार, इस बार संदीप नाईक बनेगे बेलापुर के आमदार ही चर्चा आता सर्वसामान्यांमध्येही जोर धरु लागली आहे.