नवी मुंबई : मौजे नवीन कुकशेत देवस्थान समिती व कुकशेत ग्रामस्थांच्या वतीने बुधवार, दि. १७ जुलै रोजी कुकशेत गावामध्ये आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यत विविध कार्यक्रमाचे आषाढी एकादशीनिमित्त आयोजनही या सोहळ्यात करण्यात आले आहे.
कुकशेत गावातील भुखंड क्रमांक ५-पी वरील विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ६ वाजता विठुरायाचे भजन व अभिषेक होणार आहे. सकाळी १० वाजता भजन, दुपारी ४.३० वाजता दारावे गावातील नागनाथ हरिपाठ भजनी मंडळाचे भजन, सांयकाळी ५.३० वाजता कुकशेतच्या ग्रामस्थांचे भजन, सांयकाळी ७ वाजता व ८ वाजताही भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यत विठ्ठल दर्शन व फराळाचा भाविकांना लाभ घेता येणार असल्याची माहिती कुकशेत गावाच्या सुनबाई व माजी नगरसेविका सौ. सुजाता सुरज पाटील यांनी दिली आहे.
कामातील व्यस्ततेमुळे अनेक भाविकांना इच्छा असूनही पंढरपुरी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य होत नसल्याने नेरूळ नोडमधील भाविकांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन मौजे नवीन कुकशेत देवस्थान समिती व कुकशेत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.