श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : साई भक्त महिला फाउंडेशन आणि साईभक्त सेवा मंडळ आयोजित आषाढी एकादशी या दिवशी भव्य दिव्य असे दिंडी सोहळ्या सानपाडा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. विठ्ठल नामाने सानपाडा नगरी दुमदुमल्याचे पहावयास मिळाले.
समाजसेवक पांडुरंग विठ्ठल आमले कोरोना काळापासून गेली सलग चार वर्षे सानपाडामध्ये दरवर्षी आषाढी एकादशीला दिंडीचे आयोजन करून सानपाडा वासियांना जणू प्रति पंढरपूरचा भास घडवून आणत आहेत. साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शारदा आमले यांचेही प्रत्येक कार्यक्रमास मोलाचे मार्गदर्शन लाभते. सर्वांना तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे जाणे शक्य नसल्याने त्यांना दिंडीचा मनमुराद आनंद कसा लुटता येईल. याकडे जास्त लक्ष देतात आणि ताईसुद्धा प्रत्येक कार्यात जातीने लक्ष देतात.अगदी लहानांपासून थोरापर्यंत तसेच थोरांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण वारीचा आनंद घेण्यासाठी या भव्यदिंडीमध्ये भक्ती भावाने सहभाग घेतात. बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून सर्वच भक्तगण सानपाडा सेक्टर दोन मधील शिव मंदिराजवळ सर्व जमा झाले होते. या दिंडीमध्ये आर नाईक इव्हेंटचे कलाकार, विवेकानंद संकुल सानपाडा या शाळेचे १०० विद्यार्थी, साईभक्त मंडळातील सर्व महिला तसेच साई भक्त सेवा मंडळातील सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी सेक्टर दोनमधील शिव मंदिरापाशी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता आषाढी एकादशीचा दिन सार्थकी लागला, अशी वातावरणनिर्मिती सानपाडा परिसरात निर्माण झाली होती. दुापरी १२ च्या सुमारास दिंडी प्रस्थान सुरू झाले. सहभागी सर्व वारकरी शिस्तीचे पालन करून दिंडीचा मनमुराद आनंद लुटत होते. टाळ मृदुंगाचा गजर, शाळकरी मुलांनी हातामध्ये घेतलेल्या भगवी पताका, साई भक्त महिला फाउंडेशन मधील महिलांनी घेतलेले टाळ, विठ्ठल नाम जपत, गजर करत पायी चालत होते. साई भक्त फाउंडेशन मधील महिलांचे सुंदर असे सादरीकरण टाळांच्या गजरात पार पडले. आर नाईक इव्हेंटचे कलाकारांनी विविध गाण्यांच्या नृत्यावर सादरीकरण केले. विवेकानंद संकुल सानपाडा शाळेतील विद्यार्थ्यांनीही विविध गाण्यांवर सादरीकरण केले. एकंदरीत सानपाड्यातील सर्व जमाव हे भव्य दिंडीचे स्वरूप आपल्या नेत्रांनी प्रत्येक क्षण टिपून घेत होता. काहीतरी वेगळंपण या दिंडीमध्ये आहे, हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून पहावयास मिळाले. दिंडीसाठी अनेक समाजसेवकांनी खिचडी वाटप, पाणी वाटप, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, केळी असे विविध प्रकारचे उपवासाचे पदार्थ त्यांनी सेवादान म्हणून केले.
इथे येणारा प्रत्येक जण भक्तीच दान आपल्या ओंजळीत घेऊन आनंदी मनाने घरी परतला. सर्वजण आपले सुखदुःख विसरून यामध्ये सामील झाले होते. कोणत्याही प्रकारचे क्लेश कोणाच्या मनात पाहायला मिळाले नाहीत. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध दिंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दिंडीची सांगता गणेश मंदिर येथे आरती करून झाली. उपस्थित शालेय मुलांना वह्या वाटप तसेच ग्रुप डान्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पारितोषिक देण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज फक्त आणि फक्त समाधानाचं हसू चेहऱ्यावर झळकत होते.
अशाप्रकारे हा भव्य दिव्य दिंडी सोहळा खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पांडुरंग विठ्ठल आमले आणि सौ. शारदाताई पांडुरंग आमले या उभयंतांच्या नियोजनातून हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.