सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महारपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता १९०.८९० द.ल.घ.मी. इतकी असून, विसर्ग पाणी पातळी तलांक ८८ मी. इतकी आहे. रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत मोरबे धरणात १८५.१५१ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा झालेला आहे, तसेच पाणी पातळी तलांक ८७.४० मी. इतकी झालेली आहे.
मागील दोन दिवसापासून मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरू असून असाच पाऊस सुरु राहिल्यास पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु राहून धरणाची पाणी पातळी ८७.८५ मी. इतकी झाल्यास, धरणाचे दोन्ही वक्राकार दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येऊन, जादाचे पाणी मूळ धावरी नदी पात्रात सोडण्यात येईल असे खालापूर तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासन यांस नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. तसेच त्यानंतरही, धरणाची पाणी पातळी ८८ मी. तलांक इतकी राखण्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने, धावरी नदीच्या तीरावरील विशेषत: चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, आसरोटी, कोपरी या नदीकाठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावांतील संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना व गावातील नागरिकांना धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानंतर, नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होईल, याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून सतर्कतेबाबत अनुषंगिक सुचना देण्याचे कळविण्यात आलेले आहे. तसेच या दरम्यान कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरिकांनी व पर्यटकांनी प्रवेश न करण्याबाबत आणि नदीच्या पात्रात उतरण्यास व पोहण्यास मज्जाव करणेबाबत तहसीलदारांच्या व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात असेही सूचित करण्यात आले आहे.