सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
गोविंदाप्रेमी अनुभवणार दहीहंडीसोबतच सेलिब्रिटी आणि करमणूकीचे मनोरे
सुप्रसिद्ध सिनेतारका सई ताम्हणकर यांची विशेष उपस्थिती लाभणार
नवी मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या सौजन्याने उलवे नोड येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उरण, पनवेलसह, रायगड, नवी मुंबई, मुंबई आणि परिसरातील नामांकित गोविंदा पथके याठिकाणी सलामी देण्यासाठी व दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सवाचे दिमाखात नियोजन करण्यात आले आहे.
उलवे नोड, प्लॉट नं-११४, सेक्टर १८ येथील दहीहंडी उत्सव सर्व गोविंदा प्रेमींसाठी खास असणार आहे. याचे कारण म्हणजे गोविंदाप्रेमींना दहीहंडीसोबतच करमणूकीचे मनोरे अनुभवायला मिळणार आहेत. दहीहंडी उत्सवात गीत-नृत्याच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांची झालर पांघरली जाणार आहे. यावर्षी मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची सिनेतारका सई ताम्हणकर दहीहंडी उत्सवात हजेरी लावणार आहे. उलवे नोड परिसरात सिनेतारका सई ताम्हणकर प्रथमच उपस्थित राहणार असल्याने सर्व गोविंदाप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
यावेळी ‘देवकी मीडिया’च्या माध्यमातून प्रसिद्ध नृत्यांगना हर्षा राऊत, श्रावस्ती राहुल व स्विटी लोखंडे यांच्या दिलखेचक अदाकारीने नटलेली नृत्ये गोविंदांना ताल धरायला लावणार असून ख्यातनाम गायक सतिष भानुशाली, वृशाली मालवणकर व प्राजक्ता माहुलकर यांच्या सुरावटींची पर्वणी गोविंदांना अनुभवायला मिळणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी निवेदिका शुभांगी पाटील करणार असून रिऍलिटी शोज मधील नामवंत कीबोर्ड वादक साहिल रेळेकर आणि त्यांची सर्व कलाकार मंडळी उपस्थित मान्यवर व गोविंदांचे मनोरंजन करणार आहेत.
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था व राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्यातर्फे गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी एकूण ५,५५,५५५/- रुपयांची भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. मात्र १२ वर्षाखालील बाळगोपाळांना परवानगी नसून प्रत्येक बाळगोपाळाचे ओळखपत्र सक्तीचे आहे. गोविंदांच्या सुरक्षेची विशेष काळजी देखील आयोजकांकडून घेण्यात आली असून त्यांना सेफ्टी बेल्ट तसेच सेफ्टी रोप, यांसहित सुरक्षितेकरीता व वैद्यकीय उपचाराकरिता उपयुक्त अशा उपाययोजना दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वैभव पाटील ९८१९३२५५५४, रोहित घरत ८३६९०२६२११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संस्थेतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्याप्रमाणे यंदा मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. सर्व गोविंदा पथकांसह गोविंदाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.