सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू तसेच जलजन्य व साथरोग आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नमुंमपा आरोग्य विभागामार्फत विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून याव्दारे नागरिकांमध्ये हिवताप /डेंग्यू, जलजन्य व साथरोग आजार तसेच आरोग्याविषयी प्रभावी जनजागृती केली जात आहे.
या माध्यमातून २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये हे आजार रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी तसेच आजारी पडल्यास करावयाच्या उपाययोजना याबाबत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
अशाच प्रकारची विशेष शिबिरे २८ ऑगस्ट रोजी २४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांच्या ठिकाणी भेट दिलेल्या १३,२५६ नागरिकांमध्ये जाणीव जागृती करण्यात आली. तसेच यावेळी १२१६ रक्त नमुने घेण्यात आले. आत्तापर्यंत ५ वेळा अशा प्रकारच्या विशेष शिबिरांचे आयोजन २४ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी करण्यात आले असून या शिबीरांचा लाभ ४०, ८२५ नागरिकांनी घेतला आहे.
या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे याठिकाणी ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून त्याचप्रमाणे घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे, भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लास्टिक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवित प्रोत्साहित करण्यात आले तसेच ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणेविषयी आवाहन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हिवताप / डेंग्यू नियंत्रणाकरिता आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने नष्ट केली तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे अशा गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर नवी मुंबईत हिवताप / डेंग्यू्च्या रुग्ण संख्येवर व जलजन्य / साथरोग आजारावर आळा घालणे शक्य होईल. तरी जागरूक नागरिकांनी याबाबत संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.