कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांच्या तक्रारीची महापालिकेकडून दखल
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोनमधील महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानामध्ये पाळीव श्वान घेऊन फिरणाऱ्या रहीवाशांना महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी सकाळी समज देण्यात आली आहे. महापालिकेचे स्वच्छता निरिक्षक मिलिंद आंबेकर यांनी सकाळी उद्यानात येत ही कारवाई केली आहे. पाळीव श्वानांच्या शौचासाठी परिसरातच स्वतंत्र व्यवस्था असल्याने तिथे श्वानांना घेऊन जाण्याचे निर्देश दिले. नेरूळ सेक्टर दोनमधील रहीवाशांकडून कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांना पालिकेच्या कारवाईबाबत धन्यवाद देण्यात येत आहेत.
सकाळी व सांयकाळी रहीवाशी सार्वजनिक उद्यानात श्वान घेऊन येत असल्याने व त्या श्वानाकडून उद्यानातच शौचाचा कार्यक्रम होत असल्याने उद्यानात पसरणारी दुर्गंधी व उद्यानाला आलेला बकालपणा यामुळे स्थानिक रहीवाशांना सार्वजनिक उद्यानात फिरणे व बसणे अवघड झाले होते. याबाबत विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी कॉंग्रेसच्या जिल्हा सचिव विद्याताई भांडेकर यांची भेट घेत या समस्येतून तोडगा काढण्याची मागणी केली होती. दोनच दिवसापूर्वी विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांची भेट घेत जुईनगर नोड व नेरुळ सेक्टर दोन व चारमधील नागरी समस्यांबाबत निवेदन सादर करत समस्या सोडविण्याची मागणी केली होती. त्या मागण्यांमध्ये उद्यानात श्वान घेऊन घेणे, श्नानाने मॉर्निग वॉकच्या जागेवरच शौच करणे , त्यातून दुर्गंधी पसरणे याही समस्येचा उल्लेख करत स्थानिक रहीवाशांची या समस्येतून मुक्तता करण्याची मागणी केली होती.
गुरुवारी सकाळीच महापालिकेकडून उद्यानात श्वान घेऊन येणाऱ्या नागरिकांना महापालिकेचे स्वच्छता निरिक्षक मिलिंद आंबेकर यांनी समज देत असा प्रकार पुन्हा आढळल्यास कारवाई केली जाईल असे बजावले. विद्याताई भांडेकर यांच्या तक्रारीला महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने व पालिका प्रशासनाकडून कारवाईस सुरुवात झाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यालयात येऊन विद्याताई भांडेकर यांचे आभार मानले आहेत.